हिंगोलीत सायंकाळी सात ते सकाळी सात राहणार संचारबंदी, जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

राजेश दारव्हेकर
Wednesday, 24 February 2021

हिंगोली शहरासह जिल्हाभरात रुग्णसंख्या वाढत आहे शहरातील शास्त्रीनगर भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे .

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची  संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी तथा साथ रोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी बुधवारपासून (ता. २४) रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढले आहेत. रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत संचारबंदी राहणार असून पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात रुग्णसंख्या वाढत आहे शहरातील शास्त्रीनगर भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तसेच विना मास्क फिरणार्यांना दंड लावला जात आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवार  पासून रात्री सात ते सकाळी सात वा पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मंगळवारी रात्री उशिराने हे आदेश काढले आहेत. दरम्यान या वेळेत केवळ दूध विक्रेते, जिल्हयातील शासकीय निम शासकीय कार्यालय, बँका, तसेच रुग्णालय संलग्न असलेली औषधी दुकाने, पत्रकार व कार्यालयीन कर्मचारी, त्याचबरोबर शासकीय कर्तव्य पार पडणारे अधिकारी कर्मचारी , यांना सुट देण्यात आली आहे. परंतु त्यांनी ओळखपत्र स्वतः जवळ बाळगणे गरजेचे आहे. या वेळेत पेट्रोल पंपावर केवळ शासकीय सेवा देणारी वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहने यानाच इंधन पुरवठा चालू राहणार आहे. तसेच या काळात कोणत्याही खासगी दुकान, खानावळ, हॉटेल यांना परवानगी राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल अशा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे. 

लग्न, समारंभासाठी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. या पूर्वीच जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना नोटिसी बजावून नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड आकारण्यात येईल असे आदेश काढले आहेत.आता लग्न, समारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.या नियमाचे उल्लंघन केल्यास वधू- वर पक्षातील नातेवाईकासह मंगल कार्यालय मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व दुकानदार, प्रवाशाची होणार टेस्ट कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिह्यातील सर्व आस्थापना मालक दुकानदार यांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्याकरिता एट किलोमीटर च्या अंतराने दोन कॅम्प उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a curfew in Hingoli from 7 pm to 7 am, an order issued by the Collector