नांदेडात थरार...पिस्तुल रोखून ३० लाख लंपास 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

घटना माळटेकडी गुरुद्वारा ते सामाजीक न्यायभवन दरम्यान सोमवारी (ता. १०) दुपारी एकच्या सुमारास घडली. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. 

नांदेड : बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या फळविक्रेता व्यापाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर पिस्तुल रोखून ३० लाखांची बॅग लंपास करण्यात आली. ही घटना माळटेकडी गुरुद्वारा ते सामाजीक न्यायभवन दरम्यान सोमवारी (ता. १०) दुपारी एकच्या सुमारास घडली. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. 
 
शहराच्या सांगवी परिसरात असलेल्या माळटेकडी येथे फ्रुट बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत म. साजीद म. हसन यांची दुकान आहे. ते शनिवारी व रविवारी झालेल्या व्यापाराचे ३० लाख रुपये बँकेत भरण्यासाठी आपला सहकारी सय्यद मुजफिर सय्यद गुलाब यांना घेऊन एका दुचाकीवरून नांदेडकडे निघाले. मात्र त्यांच्या मागावर असलेल्या अनोळखी तीन चोरट्यांनी पाठीमागून एका दुचाकीवरून येऊन त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. यात ते खाली पडले. यावेळी दुचाकीवरील तीन्ही चोरटे खाली उतरून त्यातील एकाने या दोघांवर पिस्तुल रोखले तर दुसऱ्याने हातात तलवार दाखविली. त्यांनी बॅग मागितली परंतु या व्यापाऱ्यांनी बॅग देण्याचे टाळले. यावेळी त्यांना थापडबुक्यानी मारहाण केली. पिस्तुलच्या धाकावर या तिघांनी ३० लाखाची बॅग जबरीने घेऊन पसार झाले. 

हेही वाचा - पोलिस ठाण्यातच आरोपीने उचलेले ‘हे’ पाऊल...वाचा सविस्तर

वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी 

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजित फस्के, विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे आपल्या पथकासह दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी करून त्या व्यापाऱ्यांना विमानतळ पोलिस ठाण्यात पाठविले. भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेला या चोरट्यांनी आव्हान दिल्याचे दिसून येते.

शहरात नाकाबंदी, पथक तैणात

फळविक्रेता हा महापालिकेतील एका नगरसेवकाचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी शहरात व बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी लावली. येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसुन चौकशी करण्यात येत होती. स्थानिक गुन्हे शाखेचे व विमानतळ पोलिस ठाण्याचे पथक या चोरट्यांना पकडण्यासाठी तैणात करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत विमानतळ पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा नोंद झाला नव्हता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatened in Nanded 30 lakh lamps with a pistol stopped, nanded news.