औरंगाबाद : चालत्या दुचाकीवरच तीन मित्रांनी आवळला मित्राचा गळा

मनोज साखरे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

  • गोगाबाबा टेकडी परिसरातील खुनाचा उडगडा 
  • संशयितांपैकी एक हद्दपार, विविध गुन्हेही 

औरंगाबाद - गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी बुधवारी (ता. 18) सकाळी वेटर तरुणाचा मृतदेह आढळला होता. या तरुणाच्या खुनाचा उलगडा झाला असून, केवळ खर्रा न दिल्याचा राग आलेल्या मित्रांनी त्याला मारहाण केली. तो जास्तच ओरडत असल्याचे पाहून संतापाच्या भरात चालत्या दुचाकीवरच त्याचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक बाब या प्रकरणात पोलिस तपासातून समोर आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. 

शफी खान रफिक खान (वय 28 , रा. अरबखिडकी, बेगमपुरा) हा घाटी रुग्णालय परिसरातील एका हॉटेलमध्ये वेटर होता. मंगळवारी (ता. 17) तो कामावर गेला नाही. बेगमपुऱ्यातील एका चहाच्या हॉटेलवर तो बसत होता. रात्री जेवणानंतर त्याला खर्रा खाण्याची सवय होती म्हणून तो नेहमीच्या ठिकाणी टाऊन हॉल येथील एका टपरीवर खर्रा खाण्यासाठी गेला. तेथे खर्रा घेतल्यानंतर काही अंतर चालत जाताच तिथे त्याचे मित्र प्रवीण भालेराव, प्रशांत साळवे व सोमेश अहिरे भेटले. त्यांनी शफीला खर्रा मागितला; परंतु "माझ्याकडे पैसे नव्हते, गल्ला फोडून पैसे काढले आणि खर्रा घेतला, मी कुणालाही खर्रा देणार नाही.'' असे त्याने मित्रांना सांगितले. त्यामुळे मित्र चिडले व तेथे शफी व मित्रांत बाचाबाची झाली. खर्रा न दिल्याने मात्र
मित्रांचा तिळपापड झाला होता. याला अद्दल घडवू असा विचार करून तिघांनी एकाच दुचाकीवर शफीलाही घेतले. त्यानंतर घाटी रुग्णालय येथील बांधकाम विभाग कार्यालयासमोर दुचाकी नेली. तेथे शफीला त्यांनी मारहाण सुरू केली. मारहाणीमुळे तो मोठ्याने ओरडू लागला. हे ऐकून आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पाहिले व त्या ठिकाणी भांडण करण्यास मज्जाव करून हुसकावून लावले. यानंतर तिघांनी पुन्हा त्याला दुचाकीवर नेत रस्त्याने मारहाण सुरू केली. त्यात त्याच्या डोक्‍याला इजा झाली. 
 
म्हणून त्याने आवळला गळा 
दुचाकीवरून जाताना प्रवीण भालेराव सर्वांत मागे व त्याच्या पुढे शफी बसला होता. लोकांनी मारताना पाहिले आणि शफी पुन्हा आपल्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करेल असा अंदाज प्रवीणला आला. त्यामुळे त्याने शफीचा गळा हाताने आवळला. दुचाकीवरून उतरल्यानंतर शफीला उतरवताना त्याची हालचाल दिसून न आल्याने तो गतप्राण झाल्याचा अंदाज सर्वांना
आला. 
-- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested in murder case at Aurangabad