तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer-Suicide
Farmer-Suicide

देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते. 

नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री अकरा वाजता ‘शेतात जाऊन येतो’ असे सांगून घरातून गेले. ते गुरुवारी सकाळपर्यंत घरी आले नाहीत. परिसरातील शेतकरी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी नीलेश यांच्या शेतातून त्यांच्या शेतात जाताना कवठाच्या झाडाला केबल वायरने गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत नीलेश यांचा मृतदेह आढळून आला. देवगाव रंगारीच्या सहायक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर यांच्यासह हेडकॉन्स्टेबल दादाराव चेळेकर यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. डॉक्‍टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. त्यांच्यामागे पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. 

मोसंबी वाचविण्यासठी विकतचे पाणी
नीलेश यांनी स्वतःच्या तीन एकर शेतीत दीड एकर कापूस, उरलेल्या क्षेत्रात मोसंबीची झाडे लावली होती. पावसाअभावी कपाशीचे उत्पन्न घटून हातात काहीच आले नाही. विहिरीला पाणी नसल्याने मोसंबीची झाडे वाचविण्यासाठी दररोज दोन हजार रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते. त्यातच खासगी फायनान्सवर घेतलेल्या ट्रॅक्‍टरचे हप्ते वेळेवर न भरता आल्याने तेही तीन महिन्यांपूर्वी जप्त करण्यात आले. दुष्काळामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीय, नातेवाइकांनी सांगितले.

विहिरीत घेतली उडी
गंगाखेड - नागठाणा (ता. गंगाखेड) येथील शेतकरी मारोती आत्माराम भागवत (वय ४२) या शेतकऱ्याने गुरुवारी (ता.२२) दुपारी तीनच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

नापिकीमुळे बॅंकेची कर्जफेड, कुटुंबाची उपजीविका कशी भागवायची या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल  उचलल्याचे  सांगण्यात आले. त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुलीचे १२ डिसेंबरला लग्न ठरले होते. तत्पूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पपई वाया गेल्याने विषप्राशन
औराद शहाजानी - व्हायरस नावाचा रोग पडल्याने दोन एकरवरील पपई झाडावरच पिकून खराब होत असल्याचे पाहून तरुण शेतकऱ्याने पपईच्या शेतातच विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना बोटकूळ (ता. निलंगा) येथे घडली. महेश व्यंकटराव मोरे (वय २८) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी गेल्या मार्चमध्ये दोन लाख रुपये खर्चून पपई लागवड केली होती. पीक काढणीला आलेले असताना ते रोगामुळे खराब होऊ लागले. व्यापारी ते घेत नव्हते. यातून आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी विष घेतले. निलंगा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com