कॉंग्रेसच्या प्रचारासाठी तीन माजी मुख्यमंत्री येणार  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेसच्या प्रचारासाठी तीन माजी मुख्यमंत्री येणार 

कॉंग्रेसच्या प्रचारासाठी तीन माजी मुख्यमंत्री येणार 

औरंगाबाद - शिवसेना-भाजप युतीत काडीमोड झाल्याचा फायदा घेण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा कंबर कसली आहे. मिनी मंत्रालयाची सत्ता राखण्यासाठी कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे या तीन माजी मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी जिल्ह्यात आणणार आहे. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही सभांचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे सत्तेतील भागीदार राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह माजी मंत्र्यांच्या प्रचारसभा घेऊन आक्रमक प्रचार करण्याचे नियोजन केले आहे. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने गंगापूर आणि वैजापूर तालुक्‍यांत आघाडी केली आहे. कन्नडच्या देवगाव रंगारी, हतनूर गटातही आघाडी झाली आहे. वैजापूरमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच, तर कॉंग्रेसला तीन जागा आल्या आहेत. पैठणमध्ये मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडी फिस्कटली. पैठणसह औरंगाबाद, फुलंबी, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्‍यात दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढत आहेत. 

कॉंग्रेसचे 51, तर राष्ट्रवादीचे 42 गटांत उमेदवार 
जिल्हा परिषदेचे 62, तर नऊ पंचायत समित्यांचे 124 गण आहेत. दोन तालुक्‍यांत आघाडी झाल्याने कॉंग्रेसने 51 गटांत, तर 102 गणांत उमेदवार दिले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे 42 गट आणि 85 गणांत उमेदवार आहेत. 20 गटांत राष्ट्रवादीचे उमेदवार नसल्याचा थेट फायदा कॉंग्रेसला होण्याची शक्‍यता आहे. 

येथे होईल सभा 
कॉंग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची शुक्रवारी (ता. 10) देवगाव रंगारी, करमाड येथे सभा होईल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची रविवारी (ता. 12) बाजार सावंगी आणि कन्नडमध्ये सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पैठण तालुक्‍यातील आपेगाव, फुलंब्रीतील गटात सभा आयोजित करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गंगापूर आणि वैजापूर तालुक्‍यातील गटांमध्ये सभा होणार आहे. 

आम्ही गटात 51, तर गणात 102 उमेदवार दिले आहेत. गंगापूर, वैजापूरसह कन्नड तालुक्‍यातील दोन गटांत आघाडी झाली आहे. स्थानिक नेत्यांसह माजी मुख्यमंत्री प्रचाराला येणार आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्ता मिळवू. 
नामदेव पवार, शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने 42 गट, 85 गणांत उमेदवार दिलेले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची गुरुवारी (ता. नऊ) चार गटांसाठी वैजापूरमध्ये एकत्रित सभा होणार आहे. त्यानंतर शिऊर येथे सभा होईल. पक्षाचे माजी मंत्रीही प्रचाराला येणार आहेत. 
-आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस