खून केल्याप्रकरणी तिघांना जन्मठेप, प्रत्यक्ष साक्षीदार फितूर

हरि तुगावकर
सोमवार, 29 जून 2020

चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी येथील लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येकी दोन हजार रुपये दंड केला आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार फितूर झाला होता. यात मृताचा मृत्युपूर्व जबाब आणि मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा दिली आहे.

लातूर : चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येकी दोन हजार रुपये दंड केला आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार फितूर झाला होता. यात मृताचा मृत्युपूर्व जबाब आणि मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा दिली आहे. हरंगुळ रेल्वेस्थानक ते हरंगुळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ता. २९ जानेवारी २०१८ रोजी रात्री नऊ वाजता अक्षय बिअर बारमध्ये सुभाष मनोहर सिद्धेश्वरे (रा. हरंगुळ) यांचा मेहुणा परमेश्वर बाबूराव लखादिवे (रा. हरंगुळ) हा दारू पीत बसला होता.

त्याच्या बाजूच्या टेबलवर आरोपी रोहित वाघमारे, पवन सरवदे, अलीम सय्यद हे दारू पीत बसले होते. त्यांनी दारूच्या नशेत बारमध्येच लखादिवे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी बारमालकाने सोडवासोडव करून सर्वांनाच बारच्या बाहेर काढले. त्यानंतर रात्री सव्वानऊच्या सुमारास प्रवीण बिअर बारसमोरील पानटपरीवर लखादिवे गेले होते. त्याच्या पाठीमागे हे तीनही आरोपी गेले. तेथे त्यांनी परमेश्वर लखादिवे यांना शिवीगाळ करून पुन्हा मारहाण केली. पवन सरवदे याने त्यांना ढकलून दिले. त्यावेळी लखादिवे जमिनीवर पडले. त्यानंतर रोहित वाघमारे याने त्याच्याजवळील चाकूने वार करून जखमी केले.

लातूर : बॅकडेटेड घोटाळ्यात तथ्य; प्रकरण आयुक्तांकडे पाठवणार

त्यानंतर लखादिवे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरू असताना ता. ३० जानेवारी २०१८ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुभाष सिद्धेश्वरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरील तिघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक ए. एन. माळी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने गुन्हा सिद्ध करण्यासाठी १४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा सरकारी पक्षाशी फितूर झाला होता. परंतु घटनेबाबत मृताने त्याच्या तोंडी मृत्युपूर्व जबाबात साक्षीदारासमोर सांगितलेल्या बाबी, साक्षीदारांनी न्यायालयासमोर सांगितल्या. तसेच अक्षय बिअर बारमध्ये मृतास झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यामुळे सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेला हा पुरावा ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश तिवारी यांनी रोहित वाघमारे, पवन सरवदे, अलीम सय्यद या तिघांना जन्मेठेपेची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (ता.२४) सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता संतोष देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना दिलीप नागराळे, पैरवी अधिकारी पोलिस हवालदार आर. टी. राठोड यांनी सहकार्य केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Get Life Imprisonment In Murder Case Latur News