'या' पदवीधर मतदारसंघात तीन लाख नवे मतदार 

प्रकाश बनकर
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

  • नोंदणीसाठी तीन लाख 20 हजार 772 अर्ज 
  • एप्रिल 2020 मध्ये निवडणुका होण्याची शक्‍यता
  • राष्ट्रवादी, भाजपकडून स्वतंत्र कॅंप लावून नोंदणी

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी एप्रिल 2020 मध्ये निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. या मतदासंघासाठी पदवीधराची नोंदणी सुरू आहे. यात गुरुवारपर्यंत (ता.सात) मराठवाड्यातून तीन लाख 20 हजार 772 अर्ज नोंदणीसाठी आले आहेत. या नोंदणीसाठी राष्ट्रवादी, भाजप यांच्याकडून स्वतंत्रपणे कॅंप लावून नोंदणी करण्यात आली आहे. यांची छाननी सुरू असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्हा आघाडीवर

मतदार नोंदणीत औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात 96 हजार 829 जणांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून सर्वत्र कॅंप लावून नोंदणी करण्यात आली. त्याचबरोबर भाजपतर्फे इच्छुक असलेल्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कॅंप लावून नोंदणी केली. यासह प्रशासनातर्फे नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. भाजपतर्फे प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदचे सदस्य किशोर शितोळे, राज्य बाल हक्‍क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे हे इच्छुक आहेत. 

छाननीत सर्वच अर्ज राहतील असा विश्‍वास

पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने एक ऑक्‍टोबर ते सहा नोव्हेंबरदरम्यान कालावधी देण्यात आला होता. दरम्यान, अनेकांनी दिवाळी व विधानसभा निवडणुकीसाठी 15 दिवस नोंदणीसाठी मुदत मागितली होती. मात्र, ती मिळाली नाही. सर्वाधिक नोंदणी ही औरंगाबाद जिल्ह्यातून झाली, तर सर्वांत कमी नोंदणी हिंगोली जिल्ह्यातून झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात 14 हजार 703 जणांनी अर्ज केले आहे. मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघ आणि 76 तालुके येतात. राजकीय पक्षाने सर्व बारकाईने उमेदवारांचे नोंदणी अर्ज भरल्यामुळे छाननीत सर्वच अर्ज राहतील असा विश्‍वासही राजकीय पक्षांनी व्यक्‍त केला आहे. 

जिल्हानिहाय नोंदणीसाठी आलेले अर्ज 

औरंगाबाद - 93,289 
जालना - 23,611 
परभणी - 27,121 
हिंगोली - 14,703 
नांदेड - 40,321 
बीड - 58,721 
उस्मानाबाद - 28,560 
लातूर - 33,906 
एकूण - 3,20,772 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lac new Voters in Marathwada Graduate Constituency