व्यापाऱ्याने आणखी तिघांना 10 लाखांचा घातला गंडा

सुषेन जाधव
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

आरोपी बंधुने जाधव यांच्याकडुन 15 लाख रुपये घेवुन पद्‌मपुरा येथील फ्लॅटची इसार पावती करुन जाधव यांना फ्लॅटचा ताबा दिला. त्यानंतर सदर फ्लॅट अलाहाबाद बॅंक औरंगाबाद यांच्याकडे गहाण असुन ते ताबा घेणार असल्याचे जाधव यांना कळाले.

  • तपासादरम्यान उघड ः पोलिस कोठडी वाढविली

औरंगाबाद : बॅंकेकडे गहाण ठेवलेला फ्लॅट खरेदी खताआधारे 15 लाखांना विक्री करुन शेतकऱ्याला गंडा घालणाऱ्या आरोपीने आणखी तिघांना 10 लाखांचा गंडा घातल्याचे पोलिस तपासादरम्यान उघड झाले आहे. अंकुश बंधू (32, रा. बन्सीलालनगर) असे त्या आरोपी व्यापाऱ्याचे नाव असून त्याला 20 सप्टेबररोजी रात्री पोलिसांनी अटक केली होती. 
रमेश जाधव (52, रा. लासुर स्टेशन ता. गंगापूर) या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अंकुश बंधु याचे शेती उपयोगी साहित्य व औजारांची श्री. ऍग्रोटेक नावाने एजन्सी आहे. या व्यवसायातून जाधव व आरोपी बंधुची ओळख झाली. आरोपी बंधुने जाधव यांच्याकडुन 15 लाख रुपये घेवुन पद्‌मपुरा येथील फ्लॅटची इसार पावती करुन जाधव यांना फ्लॅटचा ताबा दिला. त्यानंतर सदर फ्लॅट अलाहाबाद बॅंक औरंगाबाद यांच्याकडे गहाण असुन ते ताबा घेणार असल्याचे जाधव यांना कळाले. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

तीघांना घातला 
10 लाखांचा गंडा 

तपासादरम्यान आरोपीने कृषी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी विजय जाधव यांना देखील पाच लाखांना गंडा घालून करारनामा केला आहे, मात्र ते पैसे परत दिलेले नाही. तसा जबाब देखील विजय जाधव यांनी दिला आहे. तर दुसऱ्या घटनेत सुधाकर मगर यांनी आरोपीला दाल मिल खरेदी करण्यासाठी 3 लाख 3 हजार रुपये आरटीजीएसद्वारे दिले होते. तेंव्हा आरोपीने त्यांना निकृष्ठ दर्जाची दाल मिल दिली. ती दाल मिल बदलुन देण्याचे आश्वासन देवून आरोपीने पैसे देखील परत दिले नाही, असा जबाब मगर यांनी पोलिसांना दिला आहे. तर रगडे नामक व्यक्तीला अशाच प्रकारे आरोपीने 2 लाखांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. 

घरझडतीत महत्त्वाची माहिती हाती 
पोलिस कोठडीदरम्यान आरोपीने अनेकांची फसवणुक केल्याचे समोर आले. तसेच त्याच्या घराची झडतीत सात वेगवेगळ्या बॅंकेत आरोपीच्या नावे अकाउंट असल्याचे समोर आले. दरम्यान मंगळवारी आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (ता. 26) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी मंगळवारी (ता.24) दिले. आरोपीच्या घरझडतीत सापडलेल्या चेकबुकमधील काही चेक गहाळ असल्याने तपास करणे बाकी असल्याचा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three more to the dealer 10 lakhs laid waste