esakal | दुर्दैवी! जालन्यात डोहातील पाण्यात बुडून तिघा भावंडांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

दुर्दैवी! जालन्यात डोहातील पाण्यात बुडून तिघा भावंडांचा मृत्यू

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जालना): कुसळी (ता. बदनापूर) शिवारातील पाझर तलाव क्रमांक एक जवळील डोहात पावसाचे पाणी साचल्याने त्यात खेळण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून आणि चिखलात रुतल्याने मृत्यू झाला आहे. यात सख्ख्या बहीण - भावासह चुलत भावाचा समावेश आहे. मनाला चटका लावणारी ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. दहा) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, तिघांचे मृतदेह डोहाच्या बाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

कुसळीपासून चार किलोमीटर अंतरावर पाझर तलाव एक असून या ठिकाणी पावसामुळे पाण्याचे छोटे - छोटे डोह तयार झाले आहेत. या ठिकाणापासून जवळच अल्पभूधारक शेतकरी संजय व अंकुश वैद्य यांची शेती आहे. त्यांची शाळकरी मुले अक्षय संजय वैद्य (वय सात), दिपाली अंकुश वैद्य (वय दहा) व मनोज अंकुश वैद्य (वय 11) असे तिघे खेळता - खेळता सहा ते सात फूट पाण्याने भरलेल्या डोहा जवळ गेले. तसेच तिघे डोहात उतरले. मात्र पाणी आणि गाळात रुतल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. तिन्ही मुले बऱ्याच वेळापासून परतली नसल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा डोहाजवळ असलेल्या लहान मुलांनी ते डोहात उतरल्याचे सांगितले. मात्र ते तिघे नजरेस पडत नसल्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांची मदत घेतली. मात्र पाण्यात ते आढळत नसल्यामुळे काही लोकांनी तातडीने बदनापूर पोलिसांना या बाबत माहिती दिली.

हेही वाचा: औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार ठार

पोलिस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांच्यासह बदनापूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने डोहात शोध घेतला असता पाणी आणि गाळात रुतलेल्या त्या तिघांचे मृतदेह हाती लागले. एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुसळीसह परिसरात शोककळा पसरली आहे. वर्षभरापूर्वी कुसळी शिवारातील शेत तळ्यात बुडून दोन मामा - आते भावांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा कुसळी शिवारात पाण्यात बुडाल्याने तिघा बहीण - भावांचा मृत्यू झाला आहे, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. दरम्यान, तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. बंटेवाड यांनी दिली.