लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना दिवसेंदिवस पसरत आहे. त्यामुळे आतापर्यंत दहापैकी सात तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे; मात्र औसा, देवणी, शिरूर अनंतपाळ हे तीन तालुके कोरोनापासून दूर आहेत. त्यामुळे हे तालुके सध्या चिंतामुक्त आहेत; पण कोरोनाचा फैलाव होणार नाही, ही जबाबदारी पेलणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे परराज्यातून आलेल्या यात्रेकरूंमुळे सर्वप्रथम कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर मुंबईसह इतर जिल्ह्यातील आणि परराज्यातून आलेल्या नागरिकांमुळे उदगीर (५०), निलंगा (१८), जळकोट (२), चाकूर (१), अहदमपूर (४), लातूर (५), रेणापूर (२) या तालुक्यांत टप्प्याटप्प्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या सध्या ८३ झाली. यातील एक रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथील असून, त्यांच्यावर लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सध्या उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले.
त्यातील चार क्षेत्र बंद करण्यात आले असून, १७ प्रतिबंधित क्षेत्र सध्या सुरू आहेत. तेथे योग्य ती दक्षता घेतली जात आहे. शिवाय, नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ८३ रुग्णांपैकी सध्या ४४ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात २६ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे. रुग्णालयातून बरे होऊन ३६ जण घरी गेले आहेत. त्यात २१ पुरुष आणि १५ स्त्रिया आहेत. तर आजवर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष तर एका स्त्रीचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी रविवारी (ता. २४) जाहीर केली.
भीतीपोटी प्रवाशांची एसटीकडे पाठ, दोन दिवसांत अल्प प्रतिसाद
आजवरची रुग्णसंख्या
लातूर शहर व तालुका : ०५
उदगीर : ५०
निलंगा : १८
जळकोट : ०२
अहमदपूर : ०४
चाकूर : ०१
रेणापूर : ०२
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.