
हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर : तृतीयपंथी व्यक्तींवर निसर्गाने अन्याय केला; पण व्यवस्थाही त्यांना कायम दूर लोटत राहते. आजही त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत त्यांचे माणूसपण नाकारले जाते. त्यांच्या हाताला कुणी काम देत नसल्याने त्यांच्यावर कधी मंगलकार्यात, कधी रेल्वे, तर कधी सिग्नलवर टाळी वाजवून भीक मागण्याची वेळ येते. हे चित्र बदलण्यासाठी पुण्यातील थ्री फाउंडेशन संस्थेने शहरातील काही तृतीयपंथींना १० लाख रुपयांची फूड व्हॅन उपलब्ध करून दिली. त्यामुळे टाळी वाजवणारे हात शहरातील खवय्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे खमंग थाळी देणार आहेत. तृतीयपंथी व्यक्तींना समाजाकडून कायम हिणवले जाते. त्यांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी पुण्यातील थ्री फाउंडेशन संस्थेने पुढाकार घेतला. ‘द थर्ड व्हील’ नावाने शहरात त्यांना फूड व्हॅन सुरू करून देण्यात आली. यातून चार जणांना रोजगार मिळणार आहे.