तीस खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करा, अभिमन्यू पवार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

विश्वनाथ गुंजोटे
गुरुवार, 26 मार्च 2020

किल्लारी येथे माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून तीस खेडी पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरवठा केला जातो. परंतु या योजनेचे वीजबिल थकल्यामुळे गत पाच महिन्यांपासून सदर योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. यामध्ये सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी लागू आहे. या आपत्कालीन परिस्थितीत ही पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

किल्लारी (जि.लातूर) ः किल्लारी येथे माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून तीस खेडी पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरवठा केला जातो. परंतु या योजनेचे वीजबिल थकल्यामुळे गत पाच महिन्यांपासून सदर योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. यामध्ये सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी लागू आहे. या आपत्कालीन परिस्थितीत ही पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या लढाईसाठी केंद्र व राज्य शासनाने संचार बंदी केली आहे. किल्लारीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनतेची गैरसोय होत असल्याने या आपत्कालीन परिस्थितीत जनतेला पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. योजनेचे विज जोडणी महावितरण कंपनीने तोडले असल्याने सदर पाणीपुरवठा योजना बंद आहे. येथील शेतकरी व जनता दुष्काळ व अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत असल्याने पाणीपट्टी वसुली ग्रामपंचायत स्तरावर झाली नाही. योजनेचे मागील सहा महिन्यांचे व पुढील एक वर्षाचे विज बील शासनाकडून भरण्यात यावे. सदर खंडित विजपुरवठा जोडण्याबाबत व पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबत आमदार पवार यांनी विधानसभेत मागणी केली होती.

वाचा ः कोरोनाचा परिणाम ः बंदीत भुकेल्यांना रोटी, कपडा, मकान बँकेचा आधार

किल्लारीसह विधानसभा मतदारसंघातील जनतेचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. सदरील पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यावर या योजनेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी लातूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी विशेषाधिकार वापरून सदरचा खंडित वीजपुरवठा जोडण्याबाबत व किल्लारीसह इतर गावासाठी असलेली निम्न तेरणा मध्यम प्रकल्पातील तीस खेडी पाणीपुरवठा योजना सुरु करण्याची मागणी पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे केली असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

सदरील पाणीपुरवठा योजना दोन दिवसात सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी लातूर यांनी दिले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल आभार व्यक्त करतो.
- अभिमन्यु पवार, आमदार औसा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tis Khedi Water Supply Scheme To Be Start, Said Abhimanyu Pawar