
उद्या गुरूवारपासून (ता. एक) राज्य सामाईक प्रवेश परीक्षेला (एमएचसीईटी) सुरवात होणार आहे.
लातूर : राज्य सरकारच्या वतीने गुरूवारपासून (ता. एक) राज्य सामाईक प्रवेश परीक्षेला (एमएचसीईटी) सुरवात होणार आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच ही परीक्षा ऑनलाईन होत असून दोन्ही ग्रुपसाठी दोन टप्यात परीक्षा होणार आहे. गुरूवारपासून नऊ ऑक्टोबर दरम्यान पीसीबी तर १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातून तब्बल ११ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून त्यासाठी बारा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
यात नऊ केंद्र लातूर शहरात, औसा तालुक्यात एक तर निलंगा शहरात दोन केंद्र येथे आहेत. परीक्षेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. के. एम. बकवाड यांची नियुक्ती केली आहे. सकाळी साडेसात ते दुपारी बारा आणि दुपारी साडेबारा ते पावणेसात अशी दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.
'बामु' विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे ! घ्या जाणून नेमकं काय घडल...
सकाळच्या सत्रासाठी विद्यार्थ्यांना सातपासून तर दुपारच्या सत्रासाठी साडेबारापासून केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रासाठी पावणेनऊ व दुपारच्या सत्रासाठी सव्वा दोननंतर प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाच्या सुत्रांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, पारदर्शक पाणी बाटली, काळा किंवा निळ्या शाईचा पेन, प्रवेश पत्र, ओळखपत्र व अन्य परीक्षा संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
सर्व बारा परीक्षा केंद्रावर कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आल्या असून यात सर्व विद्यार्थ्यांची पल्स ऑक्सिमीटर व थर्मल स्क्रिनींगने तपासणी तसेच अन्य तपासणी करुनच प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेदिवशी पॉझिटिव्ह अलवाल आलेल्या तसेच कोरोनाची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांची शेवटच्या दिवशी परीक्षा होणार आहे. यात पीसीबी ग्रुपसाठी नऊ ऑक्टोबर तर पीसीएम ग्रुपसाठी २० ऑक्टोबर रोजी दुसऱ्या सत्रात स्वतंत्रपणे परीक्षा होणार आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना योग्य वेळी सूचना देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
लातूर : किल्लारी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली अर्पण, दुर्घटनेला पूर्ण झाली २७...
बससह सर्व सुविधांची व्यवस्था
परीक्षेसासाठी एसटी महामंडळाच्या वतीने परीक्षेच्या वेळापत्रकानुसार तालुकानिहाय बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना संबंधित आगार व्यवस्थापकांकडे नोंदणी करावी लागणार आहे. तशा सुचना विभाग नियंत्रकांनी दिल्या आहेत. परीक्षेसाठी सर्व केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून परीक्षेच्या काळात केंद्रावरील वीजपुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, असेही आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. यासोबत दूरध्वनी व इंटरनेट सेवा सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी बीएसएनएलला आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर