जायकवाडी धरणावर पर्यटकांची गर्दी

गजानन आवारे
रविवार, 18 ऑगस्ट 2019

पावसाळा सुरू झाल्यापासून जायकवाडी धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु नाशिकला चांगला पाऊस झाल्याने गोदावरीला पूर येऊन, वरील धरणांतून पाणी सोडण्यात आले. परिणामी सध्या नाथसागरात 92 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जायकवाडी, ता. 17 (जि.औरंगाबाद) : पावसाळा सुरू झाल्यापासून जायकवाडी धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु नाशिकला चांगला पाऊस झाल्याने गोदावरीला पूर येऊन, वरील धरणांतून पाणी सोडण्यात आले. परिणामी सध्या नाथसागरात 92 टक्के पाणीसाठा झाला आहे.

अपेक्षेपेक्षा जास्त पाणी नाथसागरात आल्याने कुतूहलापोटी औरंगाबादसह आजुबाजूच्या जिल्ह्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने नाथसागरातील जलसाठा पाहण्याकरिता वाहने करून परिवारासह येत आहेत. नाथसागराच्या पायथ्याशी वाहनांचा मेळावा भरल्याचे चित्र दिसत आहे. लहान मुले, महिलांसह नागरिक जलसाठा पाहून उल्हासित होत आहेत. पाण्याच्या लाटा पाहून बच्चेकंपनी जाम खूश होत आहे, तर तरुणाईला सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. आलेल्या पर्यटकांना चालता-फिरता खाण्यासाठी मक्‍याचे भाजलेले कणीस, खारी, चणेफुटाणे, काकडीची सोय किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे. निसर्गरम्य वातावरणात त्याचा आस्वाद घेण्यात वेगळीच मजा येत असून, त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांची धरण परिसरात सध्या नेहमीच गर्दी राहते.

जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक अभियंता अशोक चव्हाण, संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, बंडू अंधारे, दादासाहेब पठाडे, राजाराम गायकवाड हे कर्मचारीवर्गासह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नाथसागर पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा चालू असते. धरणाच्या भिंतीवर बच्चेकंपनीसह महिला व इतर पर्यटक येत असल्याने रस्त्यावरील वाहतून नियंत्रित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अतिउत्साही होऊन कोणी आतल्या बाजूला उतरू नये याकरिता वेगळा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भिंतीवरही पोलिस बंदोबस्त आहे. धरणाच्या सुरक्षेकरिताही बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. यामुळे पोलिस यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे जाणवते. धरणाच्या सुरक्षेचा, पर्यटकांच्या भावनेचा समतोल राखत गर्दीवर नियंत्रण ठेवत पैठणचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख हे बंदोबस्ताच्या कर्मचाऱ्यांसह कार्यरत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourists number go up at jayakwadi dam