व्यवहारातून दहा रुपयांची नाणी गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ten rupees coins for transaction

व्यवहारातून दहा रुपयांची नाणी गायब

उमरगा : उमरगा शहरासह ग्रामीण भागात दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास सर्वत्र नकार मिळत असून, हा राजमुद्रेचा अवमान आहे. बँकांनी व प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयाची नाणी बंद झाल्याची अफवा पसरविल्याने नागरिकही हे नाणे एकमेकांकडून स्वीकारत नसल्याने नाणे चलनातून बाद झाले की काय असे चित्र पाहायला मिळत आहे.

दहा रुपयाचे नाणे महाराष्ट्रातील बहुतांश भागात चलनात असल्याचे दिसून येते. मात्र उमरगा शहरासह ग्रामीण भागात दहा रुपयाची नाणी कोणी स्वीकारण्यास तयार नाही. हे नाणे बंद झाल्याचे कोणतेही आदेश रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाने दिले नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. मात्र शहरातील व परिसरातील दुकानदार सदर नाणे स्वीकारण्यास नकार देतात तर हे नाणे त्यांच्याकडून ही कोणी स्वीकारत नाही.

अनेकांकडे दहा रुपयाचे नाणे असूनही ते तसेच पडून आहेत. काही जणांनी तर ही नाणी चक्क मोडीत दिल्याचे प्रकार पहावयास मिळतात. राजमुद्रेचा सुरू असलेल्या अवमानास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. दहा रुपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वीकारावे, अशा सूचनांचे फलक सर्व बँकांनी व पतसंस्थांनी आपापल्या बँकेत लावल्यास ग्राहकांमधील गैरसमज दूर होईल, असे मत उमरगा व्यापारी महासंघाचे सचिव शिवप्रकाश लड्डा यांनी व्यक्त केले आहे.

दहा रुपयाची नाणी चलनातून बंद झालेली नाही. रिझर्व बँकेच्या नियमानुसार ती स्वीकारण्यास काही हरकत नाही. गैरसमजातून नाणे स्वीकारण्यास नकार दिला जातो. व्यापारी व नागरिकांनी ही नाणी स्वीकारली पाहिजे.

- रणधीर पवार, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, उमरगा

दहा रुपयाचे नाणे चलनात आहेत. मात्र ते स्वीकारण्याची नकारात्मक मानसिकता झाली आहे. गेल्या दोन-अडीच वर्षापासून दहा रुपयांची नाणी स्वीकारतो. अधिक नाणे जमा झाल्यानंतर कामानिमित्त पुणे, मुंबईला गेल्यानंतर चलनात आणतो. ग्राहक व व्यापाऱ्यांनी नाणे चलनात आणण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.

- प्रतिक येवते, चहा विक्रेता, उमरगा

Web Title: Traders And Customers Refusal To Accept Ten Rupees Coins For Transaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..