गंगाखेडला व्यापाऱ्याचे अडीच लाख लांबविले...!

file photo
file photo

गंगाखेड (जि.परभणी) : व्यापारी पान खाण्याच्या नादात असताना चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या हँडलला लावलेली  बॅग पळविली. या बॅगेत दोन लाख ५८ हजार रुपये होते. पान खाण्याच्या नादात चोरट्यांनी लावला चुना, म्हणून शहरात चर्चा झाडत आहे. ही घटना सोमवारी (ता. नऊ) सकाळी साडेनऊ वाजता नवा मोंढा येथे घडली. या प्रकरणी व्यापारी रंगनाथ रामराव जाधव यांच्या तक्रारीवरून सायंकाळी सहा वाजता चोरट्यांविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर लाईन येथील भाग्यनगर येथे राहणारे आडत व्यापारी रंगनाथ रामराव जाधव हे नित्यदिनक्रमानुसार सकाळी नऊ वाजता आपले प्रतिष्ठाण जिजाऊ ट्रेडिंग नवा मोंढा येथे दुचाकी क्रमांक (एम. एच. २२ ए. क्यू. ५१५१) या वाहनावरून निघाले होते. या वेळी त्यांनी दुचाकीच्या हॅंडलला अडकवलेल्या  रेक्जिन बॅगमध्ये दोन लाख ५८ हजार रुपये होते. दरम्यान, नवामोंढा परिसरात येताच पानटपरीजवळ दुचाकी लावून पान खाण्यासाठी पानटपरीवर गेले. याच वेळी त्याच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी त्याची नजर चुकवून दुचाकीला लावलेली पैशाची बॅग लंपास केली.

ओळख पटू शकली नाही 

व्यापारी रंगनाथ जाधव पानटपरीवरून पान खाऊन दुचाकीजवळ आले. या वेळी त्यांना दुचाकीच्या हॅंडलला लावलेली बॅग कोणीतरी नेल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅग घेऊन गेलेल्या चोरट्यांचा शोध व ओळख पटू शकली नाही. त्यांनी घटनेनंतर थोड्या वेळातच पोलिस ठाणे गाठून पैशाची बॅग चोरीला गेल्याचे सांगितले. 

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरट्याचा शोध घेतला. मात्र, चोरटा आढळून आला नाही. सायंकाळी सहा वाजता रंगनाथ रामराव जाधव यांनी दुचाकीला अडकवलेली दोन लाख ५८ हजार रुपयांची बॅग चोरी गेल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले असून नित्याच्या चोरीच्या घटनानी नागरिकांत पोलिसांविषयी नाराजी पसरली आहे.

हेही वाचा...


शिक्षिकेला ४९ हजार रुपयांला गंडविले !

परभणी : मोबाईलवर फोन करून नवीन क्रेडिट कार्ड ऑनलाइन चालू करायचे का? असे म्हणत बँक खात्याविषयी माहिती घेऊन एका अज्ञाताने पेशाने शिक्षक असलेल्या महिलेस ४८ हजार ७६० रुपयांला गंडविले आहे. भामट्याने ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली मधुकरराव सासवडे (वय ४५, रा. दत्त मंदिर परिसर) यांनी सदर प्रकरणी तक्रार दिली आहे. शनिवार (ता. सात) त्यांना दुपारी ३.४५ च्या सुमारास एका मोबाईल नंबरवरून फोन आला. नवीन क्रेडिट कार्ड ऑनलाइन चालू करावयाचे का? व त्याचा विमा चालू ठेवायचा किंवा बंद करायचा का? या बाबत संबंधिताने विचारणा केली. त्यानंतर संबंधिताने फिर्यादीच्या कार्डची माहिती घेतली. आणि ओटीपी क्रमांक घेऊन ४८ हजार ७६० रुपयांना गंडविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाणे गाठत त्यांनी तक्रार दिली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com