जावई पकडले पण परंपरा जपण्यासाठी गाढव भाड्याने आणावे लागले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

केज (जि. बीड): तालुक्यातील विडा (ता. केज) येथे मागच्या 80 ते 90 वर्षांपासून धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढव धिंड काढण्याची परंपरा आहे. यंदा जावई शोधण्यासाठी विडेकरांना फारशी कसरत करावी लागली नाही परंतु गावात गाढव नसल्याने त्याचा शोध घेऊन भाड्याने आणावे लागले. मंगळवारी (ता. १०) गाढव धिंडीचा मान गावातील बाबासाहेब पवार यांचे मस्साजोग (ता. केज) येथील जावई दत्तात्रय गायकवाड यांना भेटला. 

तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला साधारण 80 - 90 वर्षांपूर्वी मिरवले आणि ही परंपरा सुरू झाली. या परंपरेत कधीही खंड पडला नाही आणि साधी कुरबुर देखील झाली नाही हे विशेष. विशेष म्हणजे आतापर्यंत गावातील सर्वच समाजाच्या जावयांना हा मान मिळालेला आहे. एकदा मिळवलेला जावई पुन्हा मिरवत नाहीत. यामुळे यातून सामाजिक सलोखा आणि एकोपा देखील दिसून येतो. एकदा जावई पकडला की तो साऱ्या गावाचा होऊन जातो. लग्नात घोड्याचा हट्ट करणारे जावई एकदा हाती लागले की गुमान गाढवावर बसतात. चपलांचा हार घातलेले गाढव, त्यावर जावई आणि वाजत गाजत गावभर मिरवणूक झाल्यानंतर ग्रामदैवत राजा हनुमान मंदिराच्या पारावर मनपसंत कपड्याचा आहेर केला जातो. यंदा गावातील बाबासाहेब पवार यांचे मस्साजोग (ता. केज) येथील जावई दत्तात्रय गायकवाड यांना हा मान मिळाला.

मागच्या दोन दिवसांपासून इकडे तिकडे पळ काढला. परंतु, विडा येथील तरुणांनी त्यांना शिताफीने पकडले. परंतु गावात गाढवच नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी कसरत करावी लागली. गावातून परंपरेप्रमाणे वाजत गाजत रंगाची उधळण करत मिरवणूक निघाली. नंतर, जावई दत्तात्रय गायकवाड यांना ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ काळे, उपसरपंच बापूराव देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे, शाहजी घुटे यांनी मनपसंत कपड्याचा आहेर केला.  मिरवणूकिट तरुणांचा जल्लोष होता तर पाहण्यासाठी आबालवृद्ध, मुले, महिलांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tradition of son in law procession on donkey in Beed district

Tags
टॉपिकस
Topic Tags: