
यानिमित्ताने गावातील महिला एकत्र येवून राजा श्रीयाळ यांच्या बद्दल पारंपरिक गिते सादर करतात. त्यानिमित्ताने गावातील महिला एकत्र येतात त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो.
हिंगोली : पोतरा (ता. कळमनुरी) येथे मागच्या अनेक वर्षांपासून नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणारी श्रीयाळषष्ठी यावर्षी रविवारी (ता. २६) साधेपणाने साजरी करण्यात आली. पोतरा येथे अनेक वर्षीपासून श्रीयाळषष्ठी उत्साहात साजरी केली जाते.
यानिमित्ताने गावातील महिला एकत्र येवून राजा श्रीयाळ यांच्या बद्दल पारंपरिक गिते सादर करतात. त्यानिमित्ताने गावातील महिला एकत्र येतात त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. तर सायंकाळी राजा श्रीयाळ यांच्या पाठवणीचा कार्यक्रम होतो.
श्रीयाळषष्ठीची परंपरा आजही कायम आहे
परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. येथील राजकुमार मुलगीर यांच्या घरी वडिलोपार्जित सुरु असलेली श्रीयाळषष्ठीची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी या दिवशी सकाळी वाजतगाजत नदीवरून काळी माती आणून या मातीचे हत्ती, घोडे, अंबारी, सैन्य, राजा तयार करण्यात येतो.
हेही वाचा - धक्कादायक : शेवटसुद्धा चांगला नाही, यांच्या गलथान कारभारामुळे करावा लागला ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार
सायंकाळी राजा श्रीयाळाला नदीवर विसर्जित करण्यात येते
त्याची विधिवत पुजा करुन दिवसभर गावातील महिला या ठिकाणी बोलावून या वाड्याभोवती महिला रिंगण करुन श्रीयाळाचे गायन करतात. याबाबत राजकुमार मुलगीर यांनी सांगितले की, हा राजा अन्नदानासाठी प्रसिद्ध होता. त्याने औटघटकेचे राज्य करून प्रजेला सुखी केल्याबद्दल व या राजाविषयीचे प्रेम वर्षानुवर्षे असेच राहावे व अशाच राज्याचे राज्य असावे असे म्हणून त्याच्या आठवणी कायम ठेवण्याचे काम या श्रीयाळातून करण्यात येते. सायंकाळी राजा श्रीयाळाला नदीवर विसर्जित करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. महिलांना या कार्यक्रमास न बोलवता मातीपासून राजवाडा, राजा, सैन्य आदी तयार करून त्यांची पुजा करुन ही परंपरा कायम ठेवली आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे