बुलडाणा : सीआयएसएफच्या भरतीत युवकाचा करुण अंत

शाहीद कुरेशी
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

तालुक्यातील जहांगीरपूर येथील राहुल पद्माकर चव्हाण (२७) या युवकाचा नाशिक येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) भरतीत धावण्याच्या चाचणीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.

मोताळा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील जहांगीरपूर येथील राहुल पद्माकर चव्हाण (२७) या युवकाचा नाशिक येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) भरतीत धावण्याच्या चाचणीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर रविवारी (ता. ८) जहांगीरपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे जवान पदासाठी भरती सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी लेखी परीक्षा झाली असून, आता शारीरिक चाचणी सुरू आहे. नाशिकच्या नेहरूनगर केंद्रात दररोज सुमारे तीनशे उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. दरम्यान, मोताळा तालुक्यातील जहांगीरपूर येथील राहुल पद्माकर चव्हाण (२७) हा युवक शनिवारी (ता. ७) पाच किलोमीटर धावण्याच्या चाचणीत कोसळला. त्याला तातडीने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले.

दरम्यान, त्याच्या पार्थिवावर मूळगावी जहांगीरपूर येथे रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पद्माकर चव्हाण यांच्याकडे एक एकर शेती असून, घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना राहुल व अमोल असे दोन मुले व दोन मुली आहेत. मुलींचे लग्न झालेले आहेत. चव्हाण कुटुंबीय शेती व मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुले शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागतील, अशी आशा कुटुंबियांना होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. पद्माकर चव्हाण यांच्या धाकटया मुलाचा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. तर, मोठा मुलगा राहुलवर सीआयएसएफच्या भरतीच्या मैदानातच काळाने घाला घातला. नियतीच्या या क्रूर डावाने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लहान भावाचाही आकस्मिक मृत्यू- राहुल चव्हाण यांचा लहान भाऊ अमोल चव्हाण हा बी .ई. झालेला होता. दोन वर्षांपूर्वी तो सकाळी व्यायाम करून आला असता, अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. आता राहुलचा भरतीच्या मैदानावरच करुण अंत झाला. त्यामुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश बघून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tragic end of youth in CISF recruitment