‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ महिलांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

महिला व मुलींचे आरोग्य या विषयावर सातत्त्याने मराठवाड्यात काम करत असलेल्या शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

नांदेड : मासिक पाळी हा जरी नैसर्गिक संक्रमणाचा काळ असला तरी त्या काळातील स्वच्छता, पोषक आहार आणि आरोग्याविषयी घावयाच्या काळजीचा अभाव आजही समाजात मोठ्या प्रमाणात आहे. शालेय शिक्षण पद्धतीत अंतर्भूत नसलेल्या आणि लज्जेची बाब समजून उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या या आरोग्यविषयक बाबीला उघडपणे बोलणे हि काळाची गरज आहे. आणि याच उद्देशाने महिला व मुलींचे आरोग्य या विषयावर सातत्त्याने मराठवाड्यात काम करत असलेल्या शुभंकरोती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

सॅनिटरी पॅड निर्मितीचा प्रकल्प
महिला व मुलींच्या आरोग्यासाठी पूरक अशा उच्च दर्जाच्या सॅनिटरी पॅड निर्मितीचा प्रकल्प शुभंकरोती फाऊंडेशन तर्फे उभारण्यात येत आहे. ना नफा ना तोटा या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २५० गावातील महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, पोषक आहार, आरोग्याविषयी घावयाच्या काळजी आणि ग्रामीण भागात आज उपलब्ध नसलेल्या उच्च दर्जाच्या सॅनिटरी पॅड चा महिला स्वयंरोजगारांमार्फत पुरवठा ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे’ या उपक्रमांतर्गत केला जाणार आहे. आणि याचाच भाग म्हणून पहिला महिला प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेतर्फे घेण्यात आला.

हेही वाचलेच पाहिजे.....देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी : कुणावर व कशासाठी ते वाचा

‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे' उपक्रम
अपुरी जागा, वाढत्या धावपळीमुळे वेळेचा आणि स्वछतेचा अभाव,  मासिक पाळीभोवती असलेला लज्जा आणि न बोलण्याचा विळखा ग्रामीण भागांपासून ते शहरी भागांपर्यंत सगळीकडेच कायम असल्याने त्याबाबतची स्वच्छता फारशी पाळली जात नाही त्यामुळे ‘स्वच्छतेतून स्वयंरोजगाराकडे' हा उपक्रम केवळ सॅनेटरी पॅड उपलब्धता यापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील महिला व मुलींना मासिक पाळीचे संपूर्ण नियोजन याबाबत शिक्षित करून त्यांना स्वयंरोजगाराच्या दिशेने घेऊन जाणे या मुख्य उद्देशावर सुरु करण्यात आला आहे.

प्रशिक्षणार्थींना मिळणार माहिती
पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मासिक पाळीदरम्यान वापरले जाणाऱ्या विविध गोष्टी उदा. कपडा, सॅनेटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन इत्यादींची माहिती, मासिक पाळीची नैसर्गिक प्रक्रिया, मासिक पाळीतील स्वच्छता, अस्वछतेमुळे होणारे जंतूसंसर्ग, आवश्यक आहार आणि व्यायाम याची उपस्थित प्रशिक्षणार्थीना माहिती देण्यात आली. नंतर रोजगारासाठी व्यथित झालेल्या ग्रामीण भागातील महिलांना 'स्वच्छतेतून स्वयंरोजगार' या संकल्पनेची माहिती देण्यात आली.

हेही वाचा......कसा बनवतात आपला तिरंगी झेंडा, वाचा

तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणुन मुंबई च्या प्रशिक्षिका डॉ. शिल्पा निमकर, संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष किरण चौधरी, समुपदेशक शिवली यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात नांदेड तालुक्यातील वाडी (बु), सायाळ, वाघी, नेरली, नाळेश्वर, वाघी, गोपालचावडी, तुप्पा, खडकपुरा आदी गावातील महिला या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात टप्याटप्याने आयोजित केला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Training for women from 'cleanliness to self-employment', nanded news