औरंगाबाद : भापकर गेले, केंद्रेकर आले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्‍तपदाची माळ घालण्यात आली आहे.

औरंगाबाद - निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्‍तपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांच्या जागी धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. भापकरांच्या बदलीमुळे प्रशासकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

वर्षापूर्वी म्हणजे 3 फेब्रुवारी 2018 रोजी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले होते. त्यात डॉ. भापकर यांच्या नावाचा समावेश होता. त्यांची नियुक्‍ती पशुसंवर्धन सचिव म्हणून झाली होती. तथापि, काही तासांतच ही बदली थांबविण्यात आली. विभागीय आयुक्त म्हणून केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना रुजू होऊ नका, असा निरोप दिला गेला. दरम्यान, बदली थांबविण्यामागे मंत्री बबनराव लोणीकर असल्याचा आरोप तेव्हा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. येथे भापकरच कायम राहावेत, यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह मंत्र्यांनी आपले वजन वापरल्याची जोरदार चर्चाही रंगली होती. दरम्यान, तेव्हा भापकराची बदली थांबल्यामुळे ते याच पदावर औरंगाबादमधूनच निवृत्त होतील, अशी अटकळ होती. परंतु, सेवानिवृत्तीला अवघे तीन आठवडे शिल्लक असतानाच त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (ता.आठ) सायंकाळी उशिरा येऊन धडकले. 
  
केंद्रेकरांची एवढी धास्ती का? 
डॅशिंग आणि भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या केंद्रेकरांची राजकारण्यांनी एवढी धास्ती का घेतली? असा प्रश्‍न तेव्हा विचारला जात होता. त्याचे उत्तर केंद्रेकरांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर मिळते. परभणी जिल्ह्यातील झरी-बोरी येथील रहिवासी असलेल्या केंद्रेकरांनी प्रशासकीय सेवेत आपल्या कामाची छाप पाडलेली आहे. विशेषत: बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कामगिरी खूप गाजली. त्यांनतर औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. त्याचवेळी औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्‍तपदाचा अतिरिक्‍त कार्यभारही देण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मनपा प्रशासनाला लावलेल्या शिस्तीमुळे त्यांची पूर्णवेळ आयुक्‍त म्हणून नियुक्‍ती करावी, अशी जनतेतून मागणी होत होती. मात्र, त्यांच्यासारखा खमक्‍या अधिकारी राजकीय नेत्यांना डोईजड ठरला असता म्हणून येथे आणले गेले नाही. कृषी आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transfers of Two ias officers