esakal | माळहिवरा फाट्यावर द बर्निग ट्रकचा थरार; औषधीसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले

बोलून बातमी शोधा

The truck caught fire at Malhivara fork on Hingoli Kanergaon road.jpg

काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. ट्रकच्या पाठीमागील  वाहन चालकाने ट्रक पेटल्याची माहिती दिल्यानंतर चालक गगनदिपसिंह व क्लिनर यांनी ट्रक थांबविला व ते ट्रकमधून बाहेर आले. 

माळहिवरा फाट्यावर द बर्निग ट्रकचा थरार; औषधीसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा फाट्याजवळ रविवारी (ता.११) सकाळी आठ ते सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. चालत्या ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकमधील औषधी, इलेक्ट्रॉनिक्स व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. माळहिवराफाटा येथील गावकरी व अग्नीशमनदलाने आग आटोक्यात आणली.

ट्रक चालक गगनदिपसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथून व्हिआरएल कंपनीचे दोन ट्रक औषधी, कपडा, इलेक्टॉनिक्स वस्तू व इतर साहित्य घेऊन हैदराबादकडे जात होते. रविवारी सकाळी माळहिवरा फाट्याजवळ एक ट्रक पुढे गेला तर दुसरा ट्रक क्र.केए - 25 - डी -9436 पाठीमागून जात होता. मात्र हा ट्रक माळहिवरा फाट्याजवळ आल्यानंतर ट्रकच्या पाठीमागच्या बाजूने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. ट्रकच्या पाठीमागील  वाहन चालकाने ट्रक पेटल्याची माहिती दिल्यानंतर चालक गगनदिपसिंह व क्लिनर यांनी ट्रक थांबविला व ते ट्रकमधून बाहेर आले. 

दरम्यान, ट्रकमधील औषधी, कपडा साहित्यामुळे ट्रकमधून आगीचे गोळे बाहेर पडले तसेच धुराचे लोट उठले होते. त्यानंतर ट्रक चालक व गावकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र इंधन टाकीचा स्फोट होण्याची भितीने गावकरीही ट्रकजवळ जात नव्हते. त्यानंतर या घटनेची माहिती हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना मिळताच त्यांनी हिंगोली नगर पालिकेच्या अग्नीशमन दल घटनास्थळी पाठविले. गावकरी व अग्नीशमनदलाच्या पथकाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. तो पर्यंत ट्रकमधील काही साहित्य जळून खाक झाले व इतर साहित्याचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती.