कोरोनाबाधिताच्या संपर्कातील २३ जण क्वारंटाइन, सरपंचांना घरात अलगीकरण

सुधाकर दहिफळे
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबई येथून पानगाव (ता. रेणापूर) येथे सासरवाडीत आलेल्या जावयाचा अहवाल गुरुवारी (ता.२१) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील २० व मुंबई येथून शुक्रवारी (ता.२२) सकाळी आलेल्या तिघांना बावची (ता. रेणापूर) येथील क्वांरटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे.

रेणापूर (जि.लातूर) ः मुंबई येथून पानगाव (ता. रेणापूर) येथे सासरवाडीत आलेल्या जावयाचा अहवाल गुरुवारी (ता.२१) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील २० व मुंबई येथून शुक्रवारी (ता.२२) सकाळी आलेल्या तिघांना बावची (ता. रेणापूर) येथील क्वांरटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे. बावीस जणांची तपासणी करून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीकरिता लातूरला पाठविण्यात आले आहेत, तर पानगावच्या सरपंचांना शेतातील घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे.

मूळचे परभणी व पानगाव येथील जावई मुंबई येथील कांदिवली भागात राहत होते. ते आपल्या पत्नीसह शनिवारी (ता.१६) रात्री दहा वाजता सासरवाडी असलेल्या पानगावात आले होते. रात्रभर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीकरिता गेले. तेथून त्यांना येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या क्वारंटाइन केंद्रात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (ता.२०) त्यांच्या स्वॅबची तपासणी लातूरला करण्यात आली व गुरुवारी (ता.२१) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेले क्वारंटाइन करण्यात आलेले इतर तेरा जणांना पाच दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्याने व अहवाल आलेला नसल्याने त्यांना बुधवारीच घरी सोडण्यात आले होते. परंतु गुरुवारी मुंबईहून आलेल्या जावयाचा सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पानगाव परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गंजगोलाईलाच होती फिजिकल डिस्टन्सिंगची खरी गरज, लातूरकरांना उलगडा

जिल्हा परिषद प्रशालेच्या क्वारंटाइन केंद्रात दाखल असताना सर्वांनी शाळेच्या परिसरात श्रमदान केले होते. यामुळे पानगावमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (ता.२२) पानगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता शहर शंभर टक्के कडेकोट बंद होते. गुरुवारी संध्याकाळी तहसीलदार राहुल पाटील, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, मंडळ अधिकारी अंगद नेटके, तलाठी कमलाकर तिडके आदींनी तत्काळ दखल घेऊन कोरोनाबाधित रुग्णांच्या परिसराची पाहणी करून गल्लीत येणारे तीन रस्ते बॅरिकेड्स लावून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले तर कोरोनाबाधित क्षेत्रापासून तीन किलोमीटरच्या परिसरात बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांकरिता तपासणी नाक्याची उभारणी करून बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या गल्लीसह पानगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Three People Quarantined Renapur