फरार दोन भावांची रवानगी कारागृहात 

फरार दोन भावांची रवानगी कारागृहात 

नांदेड : मुखेड तालुक्यातील दबडे शिरुर या गावात दहा महिन्यापुर्वी झालेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना सोमवारी (ता. सहा) जानेवारी रोजी मुखेड पोलीसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवून दिले आहे.

दबडे शिरुर (ता.मुखेड) येथे ता. सहा मार्च २०१९ रोजी मारोती मंदिरासमोर परमेश्र्वर दिगंबर परसे, गंगाधर दिगंबर परसे, विठ्ठल ज्ञानोबा गोपनर, संतोष नरवटे, सुरेश ग्यानोबा गोपनर, दिगंबर दौलता परसे, चौत्राबाई दिगंबर परसे, ज्ञानोबा कृष्णाजी गोपनर, लक्ष्मीबाई ज्ञानोबा गोपनर, रसिका गंगाधर परसे यांनी संगनमत करून किशन लक्ष्मण गुट्टे (वय २७) या एस. टी. वाहकासोबत वाद घालून चाकूने त्याला भोसकुन गंभीर जखमी केले होते. त्यावेळी संघमा नामदेव कराळे या युवकाच्या पोटात सुध्दा चाकू मारण्यात आला होता. तानाजी परसे यालाही मारहाण झाली होती. 

रुग्णालयात वाहक किशन गुट्टेचा मृत्यू 

या सर्व परिस्थितीतील जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात, नांदेड येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ता. सात मार्च २०१९ रोजी किशन लक्ष्मण गुट्टे याचा मृत्यू झाला. इतर दोन जखमी काही दिवसांनी बरे झाले. संगमा कराळेच्या तक्रारीवरुन मुखेड पोलीसांनी खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवने आदी कलमाखाली दहा आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. या भांडणाचे कारण दबडे शिरुर येथील संत श्री बाळू मामा देवस्थानच्या सप्ताहाचा समारोप ता. सहा मार्च रोजी झाला. त्यावेळी किरकोळ वादातून भांडण झाले होते. त्याचा शेवट खूनात झाला होता.

आठ जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल

मुखेड पोलीसांनी त्यावेळी आठ जणांना अटक केली. कायदेशीर दृष्टीकोणातून ९० दिवसांच्या आत अटक आरोपींचे दोषारोपपत्र मुखेड न्यायालयात दाखल करावे लागते. म्हणून पोलीस निरिक्षक नरसींग आकुसकर यांनी आठ जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. यावेळी त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ प्रमाणे सुरेश ज्ञानोबा गोपनर (वय ३२) आणि विठ्ठल ज्ञानोबा गोपनर या दोन सख्या भावांना फरार दाखविले होते. 

अखेर अटकपूर्व जामिन नाही 

या दोन्ही भावांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय या ठिकाणी अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आज पोलीस निरिक्षक नरसिंग आकुसकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुरेश ज्ञानोबा गोपनर आणि विठ्ठल ज्ञानोबा गोपनर हे दोन्ही भाऊ गावाकडे येणार आहेत. त्यानुसार नरसिंग आकुसकर यांनी आपल्या इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सापळा लावून त्या दोघांना अटक केली. या प्रकरणातील १० महिन्यापासून फरार असलेले दोन्ही भाऊ यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्‍यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com