हिंगोलीत दोन मृत्यू तर ४८ पॉझिटिव्ह 

राजेश दारव्हेकर 
Monday, 14 September 2020

हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता.१३) दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्याने ४८ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. 

हिंगोली : जिल्ह्यात रविवारी (ता.१३) दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्याने ४८ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. मृतांमध्ये एक साठ वर्ष पुरुष तर दुसरा कमलानगर हिंगोली येथील ४० वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. ४३ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तपासणीत तर पाच रुग्ण हे अँटीजन टेस्टमध्ये आढळले. 

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण दोन हजार ११८ रुग्ण झाले असून, त्यापैकी एक हजार ६१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजघडीला जिल्ह्यात एकूण ४७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत २६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - लातुरात परीक्षा विद्यार्थ्यांची अन् धावपळ पालकांची, परीक्षा झाली ‘नीट’

हिंगोलीत ४४ रुग्ण बरे 
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर तपासणीत ४३ तर पाच रुग्ण ॲंन्टिजन तपासणीत आढळले. एकूण ४८ रुग्ण रविवारी बाधित आढळले. तर ४४ रुग्ण बरे झाले. यामध्ये हिंगोली परिसर २६, वसमत परिसर १२, औंढा परिसर एक, सेनगाव परिसर चार असे एकूण ४३ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक रुग्ण हिंगोली तालुक्यात आढळून आल्याने हा परिसर हॉटस्पॉट झोन झाला आहे. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण ५ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील चार रुग्ण, सेनगाव परिसर एक असे पाच रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल ४४  रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील १४, कोरोना केअर सेंटर लिंबाळा २१, कोरोना केअर सेंटर वसमत नऊ असे एकूण ४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. कोरोनाच्या सात रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ३० रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा - गव्हाऐवजी मका खा ! शासनाकडून रेशनकार्डधारकांची थट्टा

शहरी भागात पाच तर ग्रामीण भागात तीन कंटेन्मेंट झोन 
हिंगोली : शहरातील वंजारवाडा, हनुमाननगर, बांगर नगर, रामकृष्णा नगर, गवळीपुरा तर ग्रामीण क्षेत्रातील केसापुर, गंगानागर, नांदुरा या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. या रुग्णांचा फैलाव इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी हे क्षेत्र कंटेन्मेंट झोन घोषित केल्याचे आदेश काढले. त्यामुळे या भागात किंवा या गावात बाहेरील नागरिकांना आत येता येणार नसून, गावातील नागरिकांना देखील बाहेर जाता येणार नाही. शहरी भागातील नागरिकांवर पालिका तर ग्रामीण क्षेत्रात नगरपंचायतकडून बारीक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. या क्षेत्रात नागरिकांकडून उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच शहरातील मंगळवारा, यशवंत नगर, साईकृपा भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने या रुग्णाचा फैलाव इतरत्र होऊ नये म्हणून या भागात जिल्हाधिकारी जयवंशी यांनी कंटेन्मेंट मेन्ट झोन जाहीर केला. या परिसरातील नागरिकांवर पालिकेच्या वतीने लक्ष ठेवले जाणार असून, उल्लंघन केल्यास आपत्ती कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 

हिंगोली जिल्हा 
एकूण बाधित - दोन हजार ११८ 
आजचे बाधित - ४८ 
आजचे मृत्यु - दोन 
एकूण बरे - एक हजार ६१९ 
उपचार सुरु असलेले - ४७३ 
एकूण मृत्यु - २६  

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two deaths in Hingoli and 48 positive, Hingoli News