नांदेड : पोहण्यास गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

- दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून झाला मृत्यू. 

अर्धापूर : बामणी (ता अर्धापूर जिल्हा नांदेड ) येथील गावाजळून जाणाऱ्या मेंढला नाल्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता नऊ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्यात बुडणाऱ्या तिघांचा जीव वाचविण्यात गजानन मुंगल या तरूणास यश आले आहे. पण तो आपल्या भावाचा प्राण वाचवू शकला नाही. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, या बालकांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन बालकांचा प्राण वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणारा गजानन दत्तारामजी मुंगल देवदूत ठरला आहे.

या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की बामणी गावाजळून मेंढला नाला जातो. या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला असून, सध्या हा बंधारा तुडूंब भरला आहे. या बंधाऱ्यात गावातील गजानन सोनाजी कदम (वय 16), दीपक दत्तारामजी मुंगल (वय 15), विशाल उत्तम कदम, ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम हे पाच बालक दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. या पाच बालकांना बंधाऱ्यात किती पाणी आहे, याचा अंदाज आला नाही. पोहण्यासठी पाण्यात उतरले असता बुडू लागले. मदतीसाठी हाक मारत असताना गावातीलच गजानन दत्तारामजी हे आपल्या शेतातून घरी परत येत असताना मुलांचा आरडाओरड ऐकू आला व ते बंधाऱ्याकडे धावत गेले. त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली.

पाच जणांना वाचण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी विशाल उत्तम कदम, ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम यांना पाण्याच्या बाहेर काढले. तर गजानन सोनाजी कदम (वय 16), दीपक दत्तारामजी मुंगल (वय 15) या बालकांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचे वृत्त गावात पसरताच गावकऱ्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख, पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे , जमादार कोकरे, हेमंत देशपांडे, परमेश्वर कदम ,विद्यासागर वैद्य ,संजय कळके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Died After drowning in water Nanded