बालवारकरी जोपासतात दोनशे वर्षांची परंपरा

Nanded News
Nanded News

नांदेड :  सर्वसुख गोडी सर्वशास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नका...
लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायां येरझार हरीविण..., 

संत ज्ञानेश्‍वर माऊली या अभंगातून जगाला उपदेश करतात की, सर्व शास्त्रांचे सार हे शुद्ध प्रेमच आहे. जीवनातील प्रेम काढले की संसार खोटा ठरतो. माणूनस प्रेमरूप होणे हीच त्याची खरी संजीवन समाधी होय. या अभंगाला अनुसरूनच मरळक येथे ज्येष्ठांसह बालवारकरी २०० वर्षांची जोपासना करीत आहेत.


नांदेड शहरापासून मरळक हे गाव सुमारे १२ किलोमिटर अंतरावर आहे. या गावाला निसर्गाची माया मिळालेली आहे. पूर्णा रोडवरून उजव्या बाजूला या गावाला जाण्यासाठी फाटा आहे. गावापर्यंत डांबरी रस्ता असून, जाताना निसर्गाचाही आनंद लुटता येतो. मोरांचे आवाज कानी पडतात. डुलणारी झाडे, फुले बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. गावात शिरल्यानंतर पुरातन हेमाडपंती विमलेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. परिसरातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने मंदिराच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले आहे. याठिकाणी गावातील ज्येष्ठ मंडळी दररोज हरिपाठ तसेच नियमित ठरलेल्या वारानुसार भजन-गायन करतात. त्यांना दिवंगत जळबाजी महाराज मरळककर यांचे मार्गदर्शन, शिकवण मिळालेली आहे. त्यांचा वारसा पुढे चालविण्याचा प्रामाणिक आणि निःस्वार्थ प्रयत्न ग्रामस्थांसह बालवारकरी करीत आहेत.

महाशिवरात्रीला उत्सव
पुरातन हेमाडपंती मंदिर असल्याने, त्याच्या दुरुस्ती आणि विकासासाठी शासनाकडून २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातून लाईट, मंदिर परिसरात फरशी बसविण्यात आली आहे. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो. गावातून पालखी मिरवणूक काढली जाते. हनुमान जयंतीलाही मोठी यात्रा भरते. दोन दिवस पालखी मिरवणूक, रुद्राभिषेक करून कुस्त्यांचाही फड मंदिर परिसरात रंगतो. यामध्ये महाराष्ट्रातील मल्ल सहभागी होत असून, २०० वर्षांची ही परंपरा ग्रामस्थांनी एकजुटीने जोपासली आहे. श्रावण महिन्यामध्ये महिनाभर भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होत असते.

अशी आहे गावाची महती
प्रत्येक सोमवारी मंदिरासमोरील दीपमाळ पेटविली जाते. तसेच गावातून मशालीला वाजतगाजत मंदिरात आणण्याची परंपरा आजही कायम आहे. मंदिरासमोरील बारवामध्ये या दीपमाळचे प्रतिबिंब उमटून पाण्यातून बुडबुडे येतात अशी आख्यायिकाही ग्रामस्थांकडून सांगितली जाते. मुलांवर संस्कार व्हावेत, वारकरी संप्रदायाची जोपासनाही त्यांच्याकडून व्हावी म्हणून विमलेश्‍वर वारकरी शिक्षण संस्था चालविली जात आहे. या संस्थेत सद्यस्थितीत सुमारे ३० पेक्षा अधिक मुले गायनासह, पखवाज, हार्मोनिअम वाजविण्याचे शिक्षण घेत आहेत.

यांचा आहे पुढाकार
गावाची ओळख कायम टिकवून ठेवण्यासाठी विमलेश्‍वर भजन मंडळातील तात्याराव काका कदम, आक्रूर कदम, देवराव कदम, गोविंद कदम, शिवाजी इंगळे, श्रीराम शिंदे, नागोराव शिंदे, प्रभू शिंदे, ज्ञानोबा शिवंतवाड, भागवत शिंदे, नागोराव दाळकुसे, साहेबराव कदम, नामदेव शिंदे, गजानन कदम, मारुती कदम, नीळकंठ"स्वामी, पांडुरंग कदम, माधव महाराज भारती या सदस्यांसह सर्वच ग्रामस्थांचा पुढाकार आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com