esakal | विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा- न्यायाधीश डी. व्ही. कश्यप
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ता. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी अभिषेक दावलबाजे याचे दोन व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी अन्सीराम दावलबाजे यांना फोन करून खंडणीची मागणी केली होती.

विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा- न्यायाधीश डी. व्ही. कश्यप

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः शहरातील शालेय विद्यार्थांचे अपहरण करून त्याच्या पालकाला खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी शुक्रवारी (ता. ३१) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

परभणी शहरातील गवळी गल्ली परिसरातील रहिवाशी असलेल्या उषा अन्सीराम दावलबाजे यांचा मुलगा अभिषेक अन्सीराम दावलबाजे (वय १२) हा शहरातील बालविद्या मंदिर प्रशालेत शिक्षण घेतो. ता. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी अभिषेक दावलबाजे याचे दोन व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी अन्सीराम दावलबाजे यांना फोन करून खंडणीची मागणी केली होती. मुलगा अभिषेक शहरातील इदगाह मैदानावर त्याच्या मित्रासोबत दररोज क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. ता. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी या ठिकाणी आलेल्या दोन इसमांनी अभिषेकला चांगले क्रिकेट खेळतो म्हणून वीस रुपये बक्षीस दिले होते. त्यावेळी त्यांनी उद्या चांगले क्रिकेट खेळल्यास तुला बॅट देतो असे सांगून दुसऱ्या दिवशीही इदगाह मैदानावर बोलविले होते. ता. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी अभिषेक घरी परतलाच नाही. 

हेही वाचा -  कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांना पहिला डॉ. प्रज्ञा स्मृती सन्मान

सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले

त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचे मित्र सुमीत साठे व विजय उजवणकर यांच्या घरी जावून विचारपूस केली. तेव्हा अभिषेक आज एकटाच इदगाह मैदानाकडे गेला होता. आम्ही सोबत नव्हतो असे सांगितले. या प्रकरणी अपहरण झालेल्या मुलाच्या आईने नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तातडीने तापासाची चक्रे फिरवून उदगीर (जि. लातूर) येथून आरोपी जिलानी खाजा शिकलकर व कलीम शहानुर शिकलकर या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून मुलांची सुटका केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्ह्याची नोंद झाली होती. या प्रकरणी २०१८ साली फौजदार श्री. द्रोणाचार्य यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानेश्वर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी अभियोक्ता मयुर साळापूरकर यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्तांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नानलपेठ पोलिस कौतुकास पात्र

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नानलपेठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली. त्यात सहायक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे, फौजदार अनिल सनगले, पोलिस कर्मचारी संजय पुरी, सय्यद उमर, किरण भुमकर, रंगनाथ दुधाटे यांनी विशेष कामगिरी बजावली. त्यावेळी केवळ काही तासाच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून अभिषेक दावलबाजेची सुटका केली. त्यामुळे नानलपेठ पोलिस कौतुकास पात्र ठरले होते.