कार-कंटेनरच्या धडकेत तुळजापूरजवळ दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

कंटनेर व कारच्या धडकेत दोनजण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः कंटनेर व कारच्या धडकेत दोनजण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर गंधोरा (ता. तुळजापूर) शिवारात शनिवारी (ता. 24) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार कार (केए- 51, झेड- 7497) नळदुर्गमार्गे गुलबर्गाकडे (कर्नाटक) निघाली होती. तर कंटेनर (जीजे- 31, टी- 9146) नळदुर्गहून तुळजापूरकडे येत होता. या दोन्ही वाहनांची गंधोरा शिवारात धडक झाली. त्यात कारमधील दोनजण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू नरेंद्रप्रसाद शुक्‍ला (वय 54), नेहा राजू शुक्‍ला (48, रा. शहाबाजार, खडगरपुरा, गुलबर्गा, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.

जखमी मल्लिकार्जुन मलप्पा (45), स्वराज बाबूराव कानडे (35, रा. मुंबई) यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित नायकल, डॉ. बरवे यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर दोघांना सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दोन्ही जखमींचे पाय फ्रॅक्‍चर झाल्याची माहिती डॉ. नायकल यांनी दिली.

दरम्यान, नळदुर्गमार्गे येणारे संजय निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात आणले. गुलबर्गा येथून संजय सिंग यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड. धीरज पाटील यांना अपघाताबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in accident