Coronavirus : बीड जिल्ह्याची वाटचाल शंभरीकडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

नव्या दोन कोरोनाग्रस्तांसह बीड शहराचा आकडा २६ 

बीड - दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील तिघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले. या लोकांच्या संपर्कातील ३० जणांसह पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुरक्षेच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ पोलिस व चार अधिकारी अशा ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा भेटला. मात्र, याच वेळी बीड शहरातील कारंजा रोड भागात एका महिलेसह एक पुरुष कोरोनाबाधित आढळून आला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ९९ कोरोनाबाधित आढळले आहेत. 

शुक्रवारी (ता.१९) बीडच्या कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर, केजच्या उपजिल्हा रुग्णालय, आष्टीच्या उपजिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणांहून ७६ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. याची तपासणी अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’मधील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत होऊन रात्री त्याचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये दोघांना कोरोना असल्याचे समोर आले. या दोन रुग्णांसह एकट्या बीड शहराची रुग्णसंख्या आता २६ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९९ कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र, ७३ लोकांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. तीन महिलांसह एक तरुण अशा चौघांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा बीड शहरातला आहे. यातले बहुतेक मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणांहून आलेले आहेत. तर, काही या लोकांच्या संपर्कातील आहेत. शुक्रवारी आढळलेले कोरोनाग्रस्त संपर्कातील आहेत की बाहेर जिल्ह्यातून याचा शोध उशिरापर्यंत आरोग्य विभाग घेत होता. 

गूड न्यूज ! अर्ध्या महाराष्ट्रातून हद्दपार होतोय कोरोना; 'या' 16 जिल्ह्यांतील स्थिती
 

सर्वाधिक रुग्ण बीड शहरात 
आतापर्यंत जिल्ह्यात ९९ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यात सर्वाधिक २६ रुग्ण बीड शहरात आढळले आहेत. तालुक्याचा आकडा ३१ आहे. तर, माजलगाव (११), गेवराई (०४), आष्टी (१०), पाटोदा (११), शिरूर कासार (०२), वडवणी (०४), केज (०७), परळी (०७), धारूर (११) अशा रुग्णांचा समावेश आहे. 
 
माळेगावकर व पोलिस दलाला दिलासा 
माळेगाव (ता. केज) येथील महिलेचा उपचारादरम्यान चार दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कातील इतरांनाही बाधा असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कातील ३० लोकांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते; तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक व चालकालाही कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात त्यांच्या सुरक्षेनिमित्त पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्कात आला होता. त्यामुळे या संपर्कातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचाही थ्रोट स्वॅब तपासला. या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. श्री. पोद्दार मागचे काही दिवस सेल्फ क्वारंटाइन होऊन काम करत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two new cases of coronavirus at Beed