
मानवत (जि. परभणी) : मांडेवडगाव (ता. मानवत, जि. परभणी) येथे ओढ्याच्या प्रवाहात बैलगाडी पलटून एक ६५ वर्षीय शेतकरी व सातवर्षीय मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मानवत (जि. परभणी) : मांडेवडगाव (ता. मानवत, जि. परभणी) येथे ओढ्याच्या प्रवाहात बैलगाडी पलटून एक ६५ वर्षीय शेतकरी व सातवर्षीय मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मानवत तालुक्यात सोमवारी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. मांडेवडगाव येथील शेतकरी मुरलीधर रंगराव शेळके (वय ६५) हे शेतातून बैलगाडीने घराकडे परतत होते. गावाजवळील ओढ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी पलटी झाली. यात मुरलीधर रंगराव शेळके व पंकजा अंकुश शेळके (वय सात) हे पाण्यात वाहून गेले, तर अनिता अंकुश शेळके व अजय अंकुश शेळके ( वय सहा) यांना वाचविण्यात यश आले आहे. पाण्यात वाहून गेलेल्या दोघांच्या शोध सुरू असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्यात अडथळा होत आहे. या प्रवाहात दोन बैल व एक म्हैस वाहून गेली आहे.
हेही वाचा : शैक्षणीक साहित्याच्या बाजारपेठेतील किलबिलाट गायब !
परभणीत धो धो पाऊस
परभणी : परभणीसह जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजता जोरदार पावसाने तडाखा दिला. धो धो पावसामुळे परभणी शहरात सर्वत्र पाणी वाहत होते.
सध्या जिल्ह्यात दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. रविवारी दुपारी परभणीत जोरदार पाऊस पडल्यानंतर रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून अंधारून आले होते. दुपारी उकाडा वाढला होता. सायंकाळी पाच वाजता विजांच्या कडकडाटात पावसाला सुरवात झाली. जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने अगदी जवळचेदेखील दिसत नव्हते. सुमारे पाऊण तास जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे.
हेही वाचा : पाऊस म्हटला की ‘चातक’ आलाच ! , नेमगिरीत बनले पर्यटकांचे आकर्षण
रस्त्यावर गुडघाभर पाणी
गांधी पार्क, गुजरी भाग, नारायण चाळ या सखल भागात रस्त्याने गुडघाभर उंचीने पाणी वाहत होते. परिसरातील नाल्या तुंबल्याने नालीतील पाणीदेखील रस्त्याने वाहू लागले. बीएसएनएल कार्यालय ते प्रशासकीय इमारतीपर्यंत असणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. वसमत रस्त्यावर चिंतामणी महाराज मंदिर समोरच्या रस्त्यावर पाणी वाहत होते, तसेच जुन्या खासदार कार्यालयाजवळील रस्त्यावरदेखील गुडघ्यावर पाणी वाहू लागल्या ने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातदेखील याच वेळी पाऊस झाला. जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यातदेखील पावसाने हजेरी लावली. पाऊस मोठा झाल्याने उर्वरित भागात. पेरण्या सुरू होणार आहेत.