मुदतीपूर्वीच उदगीरातील पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

युवराज धोतरे
गुरुवार, 28 मे 2020

उदगीर येथील शहर व ग्रामीण पोलिस निरीक्षकांच्या मुदतीपूर्वीच गुरुवारी (ता.२८) अचानक तडकाफडकी बदल्या झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत.

उदगीर (जि.लातूर) : येथील शहर व ग्रामीण पोलिस निरीक्षकांच्या मुदतीपूर्वीच गुरुवारी (ता.२८) अचानक तडकाफडकी बदल्या झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात निरीक्षकांच्या बदल्या होऊन शहर पोलिस निरीक्षक म्हणून महेश शर्मा, तर ग्रामीण पोलिस निरीक्षक म्हणून सोपान शिरसाट यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.

राज्यात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आले. उदगीरला राज्यमंत्रिपद मिळाले तेव्हापासून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र बदल्या झाल्या नव्हत्या. या दोन्ही पोलिस निरीक्षकांच्या नेमणुका होऊन जवळपास एक ते सव्वा वर्ष पूर्ण होते न होते तोच अखेर गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी प्रशासकीय कारणास्तव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना अचानक या दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आदेशात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून दीपककुमार वाघमारे यांची तर शहर पोलिस निरीक्षक पदाचा पदभार नवीन पोलिस निरीक्षक नियुक्त होईपर्यंत शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळिराम गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Police Inspector Transfers From Udgir Latur News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: