ई-सुविधा प्रणालीत वैयक्तिक माहिती भरण्यास विद्यापीठाची स्थगिती

सुहास सदाव्रते 
Friday, 11 December 2020

जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची माहिती ई-सुविधा प्रणालीत भरण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना दिल्या होत्या

जालना: जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची माहिती ई-सुविधा प्रणालीत भरण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना दिल्या होत्या. परंतु सदर माहितीत शैक्षणिक बाबीपेक्षा वैयक्तिक माहिती अधिक भरावी लागत असल्याने प्राध्यापक संघटनांनी तक्रार नोंदविल्या आहेत. यामुळेच सदर माहिती पोर्टलवर भरण्यास विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी ( ता.९) स्थगिती दिली आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती ई-प्रणालीत भरण्याच्या सूचना शैक्षणिक विभाग उपकुलसचिव यांनी दिल्या होत्या. सदर माहिती भरण्याची ता. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.परंतु सदर माहिती भरताना शैक्षणिक बाबीपेक्षा यात वैयक्तिक माहिती अधिक भरावी लागणार असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. यावर २७ नोव्हेंबरला सकाळच्या बातमीमधून प्राध्यापकांचा प्रश्न मांडण्यात आला होता. या बातमीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने आता या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

 प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची  केवळ शैक्षणिक माहिती  घ्यावी, वैयक्तिक माहितीची काय गरज काय असा प्रश्न करीत कुलगुरु यांना संघटनेने निवेदन दिले.विद्यापीठाने ता.९ नोव्हेंबर आदेश काढत प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची शैक्षणिक माहिती गोळा करण्याच्या नावाखाली पत्र पाठवले आहे. मात्र या पत्रामध्ये सविस्तर पाहता एमकेसीएलने विद्यापीठामार्फत मागवलेली माहिती केवळ शैक्षणिक स्वरूपाची नसून खूप वैयक्तिक स्वरूपाची आहे. या माहितीचा वापर कदाचित दुसरीकडे केला जाऊ शकतो किंवा हॅक झाल्यास अनेकाचे प्रचंड नुकसान होऊ शकते. करिता आपण केवळ शैक्षणिक माहिती भरून घ्यावी, उर्वरित वैयक्तिक माहिती भरण्यास आमचा स्पष्ट नकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

विद्यापीठाने ई सुविधा प्रणालीत माहिती भरताना शैक्षणिक बाबीपेक्षा वैयक्तिक बाबी माहिती विचारली आहे.आम्ही 
कुलगुरु यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन दिले होते.माहिती भरण्यास विद्यापीठ प्रशासनाने स्थगिती दिली आहे.
- डाॅ.लक्ष्मीकांत शिंदे 
अधिसभा सदस्य

जो पर्यंत पत्रामध्ये दुरुस्ती होणार नाही तो पर्यंत ही माहिती भरणार नाही.असा पवित्रा प्राध्यापक मंडळींनी घेतला .महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी संभ्रमात  असून प्रणालीच्या माध्यमातून विद्यापीठाने व्यक्तिगत माहिती मागवली आहे की,ज्यात वजन, उंची, नाते संबंध, लग्न दिनांक, मुलांच्या जन्म दिनांक, बँक डिटेल्स, आधार, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड नंबर शिवाय शैक्षणिक पात्रता, अध्यापन अनुभव इतरही माहिती भरावी लागली. याबाबत शिक्षक,प्राध्यापक संघटनांकडून जाहीर निषेध करीत माहिती भरण्यास नकार देण्यात आला होता. संघटनांच्या निवेदनामुळे विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी (ता.९) आदेश काढत, या प्रकरणी विद्यापीठास तक्रारी प्राप्त झाल्यामुळे प्रशासकीय कारणास्तव सदरील माहिती भरण्यास पुढील आदेशा पर्यत स्थगिती देण्यात आली असल्याचे शैक्षणिक विभाग उपकुलसचिव यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University postpones filing personal information in e facility system