esakal | आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी उपयोग करा : उज्वल निकम
sakal

बोलून बातमी शोधा

ujwal-nikam.jpg

आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी उपयोग करा : उज्वल निकम

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे विद्यार्थांनी सतत मनात ठेवले पाहिजे. आपले आयुष्य आनंदाने बागडण्याचे प्रांगण नाही तर, लढण्याचे रणांगण आहे. असे समजून स्वताला तयार करा. '' , असे आवाहन राज्य शासनाचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री उज्वल निकम यांनी शनिवारी (ता.17) केले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने शनिवारी 'युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्यातील आव्हाने' या विषयावर पद्मश्री उज्वल निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवन हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून संचालक शिक्षण डॉ. विलास पाटील, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजीत पाटील, जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले यांची उपस्थिती होती.

सुरुवातीस प्रास्ताविकात कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. त्यानंतर अॅड. उज्वल निकम यांचा विद्यापीठाच्यावतीने शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पुढे बोलतांना अॅड. निकम म्हणाले, ''आपला देश कृषी प्रधान आहे. त्यामुळे अश्या कृषी विद्यापीठाची देशाला खरी गरज आहे. साऱ्या देशाची मदार या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांवर आहे. या विद्यार्थांसमोर आव्हाणे मोठी आहेत. त्यामुळे या विद्यार्थांना स्व:ताचा मार्ग स्वत: शोधावा लागेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, चांगले वाईट याचे वर्गीकरण करा. प्रगतीने पुढे जायचे असेल तर आत्मचिंतन व आत्मविश्वास आवश्यक आहे. तुमच्या नावाचा दबदबा आदराने निर्माण करा तरच, तुम्ही यशस्वी व्हाल. माझे कॉलेज, माझे राज्य व माझा देश याचा विचार सतत युवकांच्या मनात राहिला पाहिजे. आधी काय करायचे आहे ते ठरवा. मार्ग आपोआप सापडले ही यशाची गुरुकिल्ली आहे." असे ही ते म्हणाले.

कविता आणि हस्यकल्लोळ
गुन्हेगारांच्या ह्रदयात धडकी भरावी अशी कायद्याची कडक भाषा करणारे पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांच्यातील मृदु कवी परभणीकरांनी शनिवारी अनुभवला. व्याख्यानाला उशिरा झाला हा सुर पकडत अॅड.निकम यांनी उपस्थित विद्यार्थांची मानसिकता हेरत कवीता सादर केल्या. या कवितामुळे सभागृहातील वातावरण आल्हाददायक बनले. त्यांच्या कवितामुळे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्यासह उपस्थित पाहूणे, प्रेक्षक व विद्यार्थींमध्ये हस्यकल्लोळ पसरला

रस्त्यासाठी नितीन गडकरींना बोलणार
राज्यातील महत्वाचे कृषी विद्यापीठ परभणी येते आहे. या परभणीकडे येणारे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यामुळे विकासाला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे मी स्वत: केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहे असे निकम यांनी सांगितले.

loading image