कमी क्षेत्रातील शेतीसाठी शेततळे ठरताहेत उपयुक्त

अविनाश काळे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

उमरगा तालुक्‍यात तीन वर्षांत तीनशे शेततळी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना ओलिताखालील शेतीला आधार मिळत आहे. दरम्यान, कोराळ, दुधनाळ, येणेगूर, कडदोरा आदी गावांतील शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या पाण्यावर शेती फुलविण्यात यश मिळविले आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पर्जन्यमान कमी होत असल्याने कोरडवाहू शेतीबरोबरच ओलिताखालील शेतीचा व्यवसाय धोक्‍यात आला आहे. भूगर्भातील पाणीपातळी कमी झाल्याने शाश्वत पाण्याची हमी मिळत नसल्याने शासनाकडून जलसंधारणाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. कृषी विभागाकडून राबविण्यात येणारी शेततळ्याची योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. तालुक्‍यात तीन वर्षांत तीनशे शेततळी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना ओलिताखालील शेतीला आधार मिळत आहे. दरम्यान, कोराळ, दुधनाळ, येणेगूर, कडदोरा आदी गावांतील शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या पाण्यावर शेती फुलविण्यात यश मिळविले आहे. 

कोरडवाहू क्षेत्र अधिक 
तालुक्‍यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र अधिक आहे. ओलिताखाली शेतीचे क्षेत्र येण्यासाठी जवळपास 32 सिंचन प्रकल्प आहेत; मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीसाठा कमी असतो. परिणामी शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यासाठी अडचण येते. पाणी जमिनीत मुरण्यासाठी कृषी विभागाकडून कंपार्टमेंट बंडिंगची कामे शिवारात करण्यात आली आहेत. कमी पावसामुळे विहिरीत तसेच कूपनलिकेला पाणी उपलब्ध होत नाही. पावसाचे पाणी अथवा शेतीतील पाणीस्रोतातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी मागेल त्याला शेततळ्याची योजना तीन वर्षांपासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत तीनशे शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील अस्तरीकरणाच्या शेततळ्यांची संख्या जवळपास पंचवीस टक्के आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतांश शेततळ्यांत पाणी साचले आहे. त्याचा फायदा शेतीसाठी होत आहे. 

क्लिक करा - जालन्याचे हे बिल्डर होते राजेश नहारचे टार्गेट

शेततळ्यातील पाण्याने मिळाली समृद्धी 
तालुक्‍यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शेततळ्यातील पाण्याच्या आधारावर प्रयोगशील शेती करून समृद्धीचा मार्ग शोधला आहे. कोराळ येथील तात्याराव सुरवसे या जिद्दी शेतकऱ्याने एक हेक्‍टर 17 आर क्षेत्रात शेती उत्पन्नाचे नवीन प्रयोग केले आहेत. पाणीपातळी खोलवर असल्याने नऊ कूपनलिका खोदल्या; पण त्यातील दोनच कूपनलिकेला जेमजेम पाणी उपलब्ध होते. गतवर्षी एक जूनला काशी भोपळ्याची लागवड केली; मात्र पाणी नसल्याने श्री. सुरवसे यांनी टॅंकरने पाणी दिले.

भाजपला रोखता येतं हे विरोधकांना कळायला लागलं!

तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांना शिवार पाहणीत ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी श्री. सुरवसे यांना शेततळ्याची योजना घेण्याची सूचना केली. शेततळ्याच्या कामाला सुरवात करून ते पूर्ण केले. 20 गुंठे क्षेत्रात शेडनेटमध्ये वांगे, टोमॅटो व मिरचीची रोपवाटिका सुरू केली. पाच महिन्यांत रोपविक्रीतून एक लाखाचा फायदा मिळाला. जून महिन्यात सव्वाएकर क्षेत्रात कांद्याच्या रोपाची लावण करण्यात आली. पाच महिन्यांत रोपविक्रीतून जवळपास दोन लाखांचे उत्पन्न मिळाले. परत आता 42 किलो कांद्याचे बी रोपांसाठी टाकण्यात आले आहे. या उत्पन्नासाठी शेततळ्याचा आधार महत्वाचा ठरला. सध्या 20 गुंठे क्षेत्रातील हिरव्या मिरचीचे उत्पन्न सुरू झाले आहे. 
शेततळ्याच्या माध्यमातून दुधनाळ येथील बळिराम जाधव, येणेगूर येथील युनूस पांढरे यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. 

 

शेतीचे क्षेत्र कमी असले तरी पाण्याची उपलब्धता असली की, नवीन प्रयोगांतून उत्पन्न घेता येते. काशी भोपळ्याचे उत्पन्न घेताना पाणीस्रोत कोरडे पडल्याने टॅंकरचा पर्याय शोधावा लागला होता. कृषी विभागाचे अधिकारी सुनील जाधव यांनी शेततळे तयार करण्याची सूचना केली आणि धाडस करून शेततळे तयार केले. आता रोपवाटिका असो वा अन्य पालेभाज्यांसाठी शेततळ्याचा आधार महत्त्वाचा ठरला आहे. 
- तात्याराव सुरवसे, शेतकरी, कोराळ 

शाश्‍वत पाण्याचा आधार कमी होत आहे. कृषी विभागाने सुरू केलेली शेततळ्याची योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी दाखविल्याने अडचणीच्या काळात शेतीसाठी शेततळ्याचा आधार महत्त्वाचा ठरत आहे. या योजनेचा आणखी लाभ देण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. 
- सुनील जाधव, तालुका कृषी अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Useful for low field farming