esakal | मरण स्वस्त झालंय...
sakal

बोलून बातमी शोधा

कोठाकोळी (ता. भोकरदन) : गावालगतच्या तलावाच्या परिसरात ग्रामस्थांनी केलेली गर्दी.

जालना जिल्ह्यात खून, आत्महत्या, विविध घटनांत मृत्यू , पोलिसांत घटनांची नोंद

मरण स्वस्त झालंय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना - जिल्ह्यात मंगळवारी (ता. तीन) दिवसभरात मांडवा येथे खुनाची घटना उघड झाली, परतूर तालुक्‍यात नांद्रा येथे एका शेतकऱ्याने गळफास घेतला. रामनगरात विजेचा धक्‍का बसून एकाचा मृत्यू झाला. म्हशीला वाचविताना कोठाकोळीत एक युवक पाण्यात बुडाला. राजूर येथे युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. 

रामनगरात एकास विजेचा धक्‍का 
रामनगर (ता. जालना) - येथील ऋषिंदर तुकाराम सरकाळे (वय 32) या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.तीन) घडली आहे. ऋषिंदर सरकाळे हा शेतात कपाशीवर औषध फवारणीसाठी मंगळवारी गेला होता. तेव्हा विहिरीवरील कृषी पंप सुरू करण्यासाठी गेला होता. तेव्हा विजेची तार तुटून हातावर पडल्याने त्याला शॉक लागला. याप्रकरणी दिगंबर तुकाराम सरकाळे यांनी दिलेल्या महितीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली करण्यात आली आहे. ऋषिंदर याच्या पश्‍चात आई-वडील , पत्नी, मुलगी (वय 10) मुलगा (वय 5), भाऊ असा परिवार आहे. 

एकाचा गळफास 
परतूर - तालुक्‍यातील नांद्रा येथे येथील शेतकरी चंदर दादाराव मुझमुले (वय 60) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

म्हशीला वाचविताना बुडाला युवक 
पिंपळगाव रेणुकाई -  म्हशीला वाचविताना तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी तीन वाजता घडली. याबाबत पारध पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
कोठाकोळी शिवारात मंगळवारी दुपारी एक म्हैस सैरावैरा धावत तलावाजवळ गेली. पायाला दोरीचे वेसन बांधलेली असल्याने ही म्हैस पाण्यात बुडू लागली. तेव्हा हिसोडा खुर्द (ता. भोकरदन) येथील युवक अमोल सुदाम गोरे (वय 32) याने ते पाहिले. तो म्हशीला वाचविण्यासाठी तलावात गेला. मात्र, गाळात फसला गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर म्हैसही पाण्यात बुडाली. साप चावल्याने ही म्हैस सैरावैरा धावत तलावात गेल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, युवक संतोष बावस्कर, गणेश गोरे यांनी पाण्यातील अमोल याचा मृतदेह काढण्यासाठी मदतकार्य केले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी जळगाव सपकाळ येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार प्रकाश सिनकर, सुरेश पडोळ करीत आहेत. 

खून प्रकरणाची होईना उकल 
पारध - जाळीचा देव (ता. भोकरदन) परिसरातील घाटात गेल्या आठवड्यात एका 42 वर्षीय व्यक्‍तीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात नोंद झाली. मात्र, या खून प्रकरणाची उकल अजूनही झाली नाही. त्यामुळे घटनेतील गूढ कायमच आहे. ओळख न पटल्यामुळे मृतदेहावर पोलिसांनाच अंत्यसंस्कार करावे लागले होते. दरम्यान, राज्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना या घटनेची माहिती कळविण्यात आली असून तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले. 

loading image
go to top