esakal | ‘वंचित’चे सिलेंडर रिकामेच
sakal

बोलून बातमी शोधा

‘वंचित’चे सिलेंडर रिकामेच

लोकसभेला जिल्ह्यात पावणेदोन लाखाची मजल मारल्याने विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने आपले नऊ उमेदवार निवडणुकीला उभे केले. मात्र, त्यांचे सिलेंडर रिकामेच राहिले.

‘वंचित’चे सिलेंडर रिकामेच

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लोकसभेला जिल्ह्यात पावणेदोन लाखाची मजल मारल्याने विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने आपले नऊ उमेदवार निवडणुकीला उभे केले. मात्र, त्यांचे सिलेंडर रिकामेच राहिले. वंचितला एकही जागा निवडून आणता आली नसली तरी त्यांचे मताधिक्य मात्र आठ हजार ६४३ ने वाढले आहे. 

नांदेड लोकसभेच्या वेळी वंचितचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्याशी हातमिळवणी करून राज्यात आपले उमेदवार उभे केले. त्यांना औरंगाबादमधून यश मिळाले. लोकसभेत वंचितमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसला नेस्तनाबूत केले. अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे मते मिळविली. ऑक्टोबरमध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने आपले वर्चस्व लोकसभेला दाखवून दिले. मात्र, लोकसभेची निवडणूक संपताच वंचित आणि एमआयएमच्या दोस्तीला ग्रहण लागले आणि या दोन्ही पक्षाची युती तुटली. याचा तोटा विधानसभा निवडणुकीत बसला.

राज्यभर सर्व जागा लढणारा एकमेव पक्ष असला तरी त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. नांदेड लोकसभेला एक लाख 66 हजार 176 मते प्रा. यशपाल भिंगे यांना मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विधानसभेत वंचितचे खाते उघडेल असे अनेकांनी गणित मांडले होते. मात्र या जिल्ह्यातच नव्हे तर संबंध राज्यभर वंचितचे सिलेंडर रिकामेच राहिले.

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात लोकसभेपेक्षा मताधिक्य अधिक मिळविले. वंचितला एक लाख ७४ हजार ८३९ मते आपल्या खात्यात पाडून घेतले. त्यात नांदेड दक्षिणमधून फारूख अहेमद- ३६ हजार ७१३, नांदेड उत्तर मुकूंद चावरे- २६ हजार ५६९, लोहा शिवा नरंगले- ३७ हजार ३०६, हदगाव मधुसूधन भारती- १० हजार ५६, देगलूर प्रा. रामचंद्र भरांडे- १२ हजार ५७,  किनवट प्रा. हमराज उईके- ११ हजार ७६४, मुखेड जीवन दरेगावे- आठ हजरा ७५१ आणि भेकरमधून नामदेव आईलवाड यांना १७ हजार ८१३ मते मिळाली.   

लोकसभा व विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका पक्षाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या ताकदीने लढविल्या. परंतु या दोन्ही निवडणुकीत निर्माण झालेली उणिव येणाऱ्या काळात भरून काढणार आहे. ऑक्टोबर - १८ ते ऑक्टोबर - १९ असे एकच वर्ष स्थापनेला झाले. तरीही सर्व जागा लढविल्या.

आता पक्ष बांधणीसाठी पुरेसा वेळ असून, स्थानिक संस्थांमध्ये पुन्हा ताकदीने समोर येणार असून, दोन्ही निवडणुकीत झालेल्या पराभवाने न खचता पुन्हा उमेदीने कार्यकर्ते कामाला लागणार असे मत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव शाम कांबळे यांनी सांगितले.

loading image