Latur News : कडधान्य स्वस्त, पण डाळी मात्र महाग; बाजारात भाजीपाल्याचे दर तेजीत, पाण्याअभावी लागवड कमी

एकीकडे तूर, मूग, उडीद, हरभरा या कडधान्याचे दर बाजारात घसरलेले असताना दुसरीकडे डाळी मात्र अजूनही महागच आहेत. विशेष म्हणजे स्वयंपाकात डाळींना पर्याय असलेल्या भाजीपाल्याचे दरही तेजीत आहेत.
vegetable and food grains fluctuation in market price due to water supply
vegetable and food grains fluctuation in market price due to water supplySakal

जळकोट (जि.लातूर) : एकीकडे तूर, मूग, उडीद, हरभरा या कडधान्याचे दर बाजारात घसरलेले असताना दुसरीकडे डाळी मात्र अजूनही महागच आहेत. विशेष म्हणजे स्वयंपाकात डाळींना पर्याय असलेल्या भाजीपाल्याचे दरही तेजीत आहेत.

मागील महिन्यात तुरीचा दर बारा हजार रुपये क्विंटल होता, तो आता ९ हजार ५०० रुपयापर्यंत खाली आला आहे. सोबत मूग, उडीद, हरभरा या कडधान्याचे बाजारातील दर कोसळलेले आहेत. मात्र डाळींच्या दरातील तेजी कमी झालेली नाही.

किरकोळ बाजारात तूरडाळ १७० रुपये, मूग १३०, उडीद १५०,तर हरभरा डाळ ८५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. कडधान्याचे दर कमी असले तरी डाळीचे दर किरकोळ बाजारात अद्याप कमी झालेले नाहीत.

अनेकजण डाळीला पर्याय म्हणून स्वयंपाकात भाजीपाल्यास प्राधान्य देतात. दुसरीकडे यंदा पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी भाजीपाल्याचे पीक घेणे अवघड झाले आहे. परिणामी आतापासूनच शहरासह ग्रामीण भागात भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत.

दरवर्षी हिवाळ्यात भाजीपाल्याचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असतात. रब्बीच्या पेरणीबरोबर अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात. त्यामुळे सध्याच्या कालावधीत भाजीपाल्याचे दर आवाक्यात असतात. परंतु यंदा जानेवारी महिना संपत आला तरी भाजीपाल्याचे दर वधारलेले आहेत.

परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्ध नाही. त्याचा परिणाम भाजीपाल्याचे उत्पादनावर होईल, त्यामुळे आवक घटून पुढील काळात भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरवर्षी परतीच्या पावसावर व रब्बी हंगामात सोनवळा, उमरगा रेती, माळहिप्परगा, रावणकोळा, घोणसी, जगळपूरसह विविध भागात भाजीपाल्याची शेती करतात. यंदा मात्र पाणी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांना जगविण्यासाठी भाजीपाल्याची शेती मोडीत काढलेली आहे. सध्या बाजारात मेथी,पालकाची जुडी वीस रुपयाला, वांगी, दोडकी, कारले, कोबी तीस रुपये पावशेर दराने विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com