‘या’ शहरात आता कॉलन्यांमध्ये उभारले भाजीपाला केंद्र

bhaji
bhaji

परभणी ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्याचा उपाय म्हणून सध्या शहरातील भाजी व फळ विक्री बाजारपेठ बंद ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी परभणीतील प्रत्येक नगर व कॉलनीमध्ये असलेल्या खुल्या जागेत, शेतकऱ्यांकडून उत्पादित केलेल्या भाज्या व फळ विक्रीसाठी स्टॉलच्या माध्यमातून विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

परभणी तालुक्यातील वर्णेश्वर शेतकरी उत्पादक गट व शेतकरी पणन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.दहा) शिवाजीनगर येथे या केंद्राचे उद्‍घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

येथील नागरिकांनी केली खरेदी 
या वेळी पणन अधिकारी पंकज चाटे, जिल्हा सहनिबंधक कार्यालयीन अधीक्षक बी .एस. नांदापूरकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, गोविंद कदम, दिलीप ताडकळसकर, बाळासाहेब मोहरीर, शिवकुमार बुद्रुककर, रवींद्र शिंदे, पवनकुमार झांजरी, दत्ता मुजूमदार, सचिन सामाले, अनंत मुजूमदार, सुमित हराळ उपस्थित होते. या केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेल्या दीड क्विंटल भाजी व फळांची शिवाजीनगर, विष्णूनगर, गौतमनगर आणि संभाजीनगर येथील नागरिकांनी शुक्रवारी खरेदी केली.

लोकसेवकांची सेवा नागरिकांसाठी ठरतेय आधार
शहरात संचारबंदीच्या काळात प्रभागाच्या नागरिकांना येणाऱ्या अत्यावश्यक अडचणी सोडवण्यासाठी शहराच्या विविध प्रभागातील अनेक नगरसेवक सक्रीय झाले असून विशेषतः आरोग्यविषयक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही सेवा नागरिकांना दिलासा व आधार देणारी ठरत आहे. प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे हे फलीत असून त्यासाठी नागरिकांची साथ देखील मोलाची ठरली आहे.

नगरसेवक दिवसरात्र सक्रीय
शहराच्या अनेक प्रभागातील नगरसेवक दिवसरात्र सक्रीय असल्याचे चित्र आहे. अनेकांनी प्रभागातील नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी आपआपल्या प्रभागात भाज्या, फळे उपलब्ध करून दिली. काहींनी आपल्या प्रभागात येणारे रस्ते बंद केले आहेत. तर काहींनी वाहनसेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याच बरोबर अनेकांच्या प्रभागात हातावर पोट असणारे नागरीक देखील मोठ्या संख्येने आहेत. त्यातही शिधापत्रिका नसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशांसाठी अन्नधान्य व अन्य साहित्य देण्यासाठी देखील काही नगरसेवक सक्रीय आहेत. विशेषतः आपत्कालीन आरोग्यविषयी परिस्थिती उद्भवल्यास अशांसाठी तर त्यांची सेवा देवदुतासारखी ठरत आहे.

अशी आहेत मदतीची उदाहरणे
आपल्या प्रभागात शिधापत्रिका नसलेल्यांची नोंद घेऊन त्यांच्या याद्या प्रशासनाला देण्यात सहकार्याची भूमिका देखील घेत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी (ता.नऊ) संत गाडगेबाबा नगर येथील एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध करून दवाखान्यात भर्ती करण्याचे काम सचिन देशमुख यांनी केले तर रात्री दिल्लीवरून आलेल्या एका ट्रकचालकाला विश्वजीत बुधवंत व अक्षय देशमुख यांनी पाठपुरावा करून तपासणी करण्यास भाग पाडले. चंद्रकांत शिंदे, रितेश जैन ही विविध प्रकारच्या सेवा देत असून विकास लंगोटे हे शिधापत्रिका नसलेल्यांना शासनाकडून अन्नधान्य मिळावे पत्रव्यवहार करीत आहेत. ही प्रतिनिधीक उदाहरणे असली तरी अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक व इच्छुक देखील सक्रीय असल्याचे चित्र असून जोखीम पत्करून ते सेवा देत आहेत. 

उद्या कल्याणनगर येथे केंद्र 
नागरिकांनी सकाळी सात ते अकरा या वेळेत गर्दी न करता या केंद्रांचा उपयोग करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. शनिवारी (ता. ११) शिवरामनगर, कल्याणनगर, संत दासगणूनगर, आशीर्वादनगर, येलदरकर कॉलनी येथील नागरिकांसाठी कल्याणनगर येथे सदर केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. राहुल पाटील, आमदार, परभणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com