Video : बाजारपेठ पूर्ववत सुरू; खरेदीसाठी उडाली झुंबड

कैलास चव्हाण
Monday, 1 June 2020

कोरोनाच्या शिरकाव झाल्यानंतर ता. २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आल्याने तेव्हापासून बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद असल्याने मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. आता पाचवा लॉकडाउन सुरू झाला आहे.

परभणी : लॉकडाउनमध्ये सूट मिळाल्याने परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ सोमवारी (ता. एक) सुरू झाल्याने शहर गजबजून गेले होते. सर्वच रस्त्यांवर वर्दळ आणि गर्दी दिसून आली. ७६ दिवसांनंतर बाजारपेठ पूर्ववत सुरू झाल्याने ढासळलेल्या अर्थकारणाला गती मिळणार आहे.

कोरोनाच्या शिरकाव झाल्यानंतर ता. २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आल्याने तेव्हापासून बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद असल्याने मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. आता पाचवा लॉकडाउन सुरू झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या लॉकडाउनमध्ये मोटी सूट दिली आहे. जिल्हा प्रशासनाने रविवारी आदेश काढत बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी वार निश्चित करण्यात आले आहेत. सोमवारी बाजारपेठ सुरू होण्याचा पहिलाच दिवस असल्याने सकाळपासून रस्त्यावर मोठी वर्दळ दिसून आली. रस्त्यावर अडवले जात नसल्याने ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने वाहने शहरात दाखल झाली. त्यामुळे वसमत रस्ता, जिंतूर रस्ता, गंगाखेड रस्ता गर्दीने फुलला होता.

दुकानांवर सकाळपासून रांगा
शहरातील अन्य रस्त्यांवरदेखील मोठी वाहतूक दिसून आली. सोमवारी कपडे, रेडीमेड कपडे, टेलर्स, घड्याळ, सराफ, बेल्टिंग, बॅग्स, इमिटेशन ज्वेलरी, पुस्तके, सायकल, स्टील ट्रेडर्स, सिमेंट, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरिअल, पेंट, फुटवेअर, प्लायवूड आदी दुकाने सुरू झाली आहेत. बाजारपेठेत पहिल्या दिवशी परवानगी दिलेली दुकाने उघडली होती. अनके व्यापारी सकाळपासून दुकानांची साफसफाई करताना दिसून आले. तर काही दुकानांवर सकाळपासून रांगा लागल्या होत्या.

हेही वाचाच - नृत्यातून आनंदी जीवन जगण्याचा विद्यार्थ्यांचा संदेश... - ​

खते, बियाणे खरेदीसाठी झुंबड
कपडा मार्केट सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दी झाली. अनेक दिवसांनंतर कपडा मार्केट सुरू झाल्याने अनेकांनी कपडे खरेदी करण्यावर भर दिला. शहरातील कच्छी लाईन, गुजरी बाजार, गांधी पार्क, शिवाजी चौक, स्टेशन रस्ता भाग गजबजून गेला होता. पूर्वमौसमी पाऊस पडल्याने शहरातील बाजार समितीमध्येदेखील खते, बियाणे खरेदीसाठी झुंबड उडाली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video Market Resumes The Rush To Shop Parbhani News