सोमवारी जमावबंदीचा आदेश झुगात नांदेड शहरातील काही अतिउत्साहित नागरीकांनी बिनधास्त रस्त्यावर स्वार होत कायद्याची पायमल्ली करुन स्वतःचा व दुसऱ्यांचा जिव धोक्यात घालत आहेत.
नांदेड : ‘कोरोना’ व्हायरसच्या भितीने राज्यात जमावबंदी कायदा (कलम १४४) सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) सकाळी पाच वाजेपासून लाग करण्यात आला. जमाव बंदीच्या भितीने तरी, नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत व ‘कोरोना’ व्हायरसला आळा घालणे शक्य होईल असे वाटत होते. परंतु, सोमवारी जमावबंदीचा आदेश झुगात नांदेड शहरातील काही अतिउत्साहित नागरीकांनी बिनधास्त रस्त्यावर स्वार होत कायद्याची पायमल्ली करुन स्वतःचा व दुसऱ्यांचा जिव धोक्यात घालत आहेत.
मंगळवारी (ता.३१ मार्च २०२०) पर्यंत जमावबंदीचा कायदा लागु करण्यात आला आहे. या दरम्यान कुणीही घराबाहेर पडु नये. तसेच अत्यावश्यक सेवा सुविधाच सुरु ठेवण्यात येणार आहे. असे असताना देखील काही अती उत्साही नागरीक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेला ‘या’ नागरीकांना हात जोडून समजावून सांगण्याची वेळ आली अहे. तरीही ते ऐकत नसल्याने पोलिसांना बळाचाही वापर करावा लागत आहे.
अतिउत्साही नागरीकांना पोलिस प्रशासनातील अधिकारी स्वतः रस्त्यावर थांबुन ‘‘आम्ही तुमच्यासाठीच आहोत. आता तरी सुधरा, स्वतःची काळजी घ्या. घरात बसा’’ असे सांगत आहेत. तरी देखील नागरीक रस्त्यावर गर्दी करत आहेत. खोटी कारणे सांगुन पोलिस प्रशासनाची दिशाभूल करत गाडीवर फिरत आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या रस्त्यावर फिरणारे बहुतेक नागरीक कुठलीही काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहेत. विना मास्क एकापेक्षा जास्त लोक बाईकवर बसून रस्त्याने फिरत आहेत.
नांदेड शहरात प्रवेश करण्यासाठी राजकॉर्न पासून ते वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय चौक, शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोंढा, बर्की चौक, सराफा बाजार असा हा एकमेव महत्वाचा आणि सर्वात वर्दळीचा रस्ता. परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळी ११ पर्यंत रॉजकॉर्नवर कुठलिही बॅरीकेट्स लावलेले नव्हते. त्यामुळे छत्रपती चौक, तरोडा नाका आणि चैतन्यनगर विमानतळ रस्त्यावरुन थेट नागरीक शहरात प्रवेश करत होते. राजकॉर्नहून पुढे वर्कशॉपकडे किंवा श्रीनगर परिसरात नागरीकांना रोखण्यासाठी कुठेच आडकाठी केली जात नाही. त्यामुळे लोक पुढे कुच करुन शहरात पसरत आहेत. नको त्या ठिकाणी गर्दी करुन १४४ कलमाचे उल्लंघन करत आहेत. ऐनवेळी शहरात वाढलेली गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी थेट आयटीआय चौकात बॅरीकेट्स लावून गर्दी दुपारी १२ वाजता आटोक्यात आणली.
एसटी महामंडळाच्या कर्मशॉपमध्ये कर्मचारी कामावर
राज्य शासनाने सुरुवातीला शासकीय कार्यालयात अभ्यांगतांचीच नव्हे तर, कर्मचाऱ्यांमध्ये देखील दोन हाताचे समांतर अंतर राखता यावे म्हणून पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. त्यानंतर शासकीय कार्यालयात थेट पाच टक्के इतक्याच कर्मचाऱ्यांना एकेदिवशी कामावर बोलविले जात आहेत. हा नियम सर्व शासकीय व खासगी कार्यालय कंपनी यांना लागु आहे. यात एसटी महामंडळाचाही समावेश आहे. ३१ मार्च पर्यंत बससेवा बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र नांदेडच्या एसटी महामंडळातील वर्कशॉपमधील ८० ते ९० कर्मचारी विना मास्क एकाचवेळी वर्कशॉपमध्ये दाटीवाटीने काम करत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना कायदा लागु केला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय एसटी महामंडळातील वरिष्ठांच्या या भूमिकेवर खुद्द कामगार कर्मचारी संघटनाही नारीजी व्यक्त करत आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.