esakal | गाव तसे चांगले, पण समस्यांनी गांजले, कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

JTR20A00187

जिंतूर शहरात मुलभूत समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. 

गाव तसे चांगले, पण समस्यांनी गांजले, कुठे ते वाचा

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर ः अगोदरच कोरोनाची धास्ती त्यात वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता या मुलभूत समस्यांची भर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, नगरपरिदेला मुख्याधिकारी नसल्याने महसूल प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन नागरिकांच्या जिव्हाळ्याची समस्या दूर करून दिलासा द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

दिवस-रात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे शक्य होत नाही. डासांचा उपद्रव घरात बसू देत नाही, अशावेळी लहान मुलांना खूप त्रास होत असल्याने ते चिडचिड करतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. वीजेवर आधारित व्यावसायिकांचे नुकसान होते, विद्युत उपकरणे बंद पडत असल्याने कार्यालयांतर्गतची कामे ठप्प होतात. अनेक प्रभागातील विद्युत रोहित्र नादुरुस्त आहेत, काही कमी क्षमतेचे आहेत त्यामुळे वीजेच्या समस्येत भर पडत आहे. 

रहदारीच्या रस्त्यांची दुरवस्था 
चार-दोन रस्ते सोडले तर शहरातील नव्या जुन्यासह बहुतेक रस्ते खराब आहेत. नगरपरिषदेने गतवर्षी याच दिवसात मुख्य बाजारपेठेतील पोलिस स्टेशन ते शिवाजी मोहल्ला, मध्यवर्ती चौक ते नृसिंह चौक, टपाल कार्यालय ते मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग व इतर भागातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले. त्याच्या काही दिवसानंतरच बहुतेक रस्ते उखडून त्यावर खड्डे पडले. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील सततच्या रहदारीच्या रस्त्यांची दुरवस्था झाली. त्याचप्रमाणे मध्यवर्ती चौक ते गणपती मंदिर व परिसरातील रस्ता, भुजंगवाडी भागातील रस्ता, खैरी प्लॉट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सवाई माता मंदिर, बलसा रोड भागातील रस्त्यांची तर अनेक दिवसांपासून फारच दैन्यावस्था झाली. जमजम कॉलनीत तर रस्त्यांचा अभावच दिसतो. अनेक ठिकाणी धावल्यावर आणि रस्ते खाली असल्याने पावसाचे तसेच सांडपाणी रस्त्यावर साचते. स्वच्छतेचा विभागाची यंत्रणा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसतात .मोकाट डुकरे त्यातील घाण इतरत्र पसरवतात. 

हेही वाचा - सावधान : इसापूर धरणाचे पाच दरवाजे उघडले, 240.27 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग

पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडले 
पाणीपुरवठा योजनेसाठी मुबलक पाणी असताना शहरात पाण्याची समस्या तर फारच गंभीर दिसते. शहरातील वितरण व्यवस्थेला वेळापत्रकच नसल्याने वेगवेळ्या प्रभागातील अनेक ठिकाणी चार-सहा दिवसांनी काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त दिवसानंतर नळांना पाणी येते. ज्या भागात नव्या वितरणिका आहेत त्या भागात नव्या व जुन्या वितरणिकांद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याच्या शुध्दतेबाबतची समस्यादेखील मधूनच निर्माण होत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. 

हेही वाचा - Video- परभणी : आमदारांच्या घरासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने

काही भागातील पाणी पिण्यास अयोग्य 
जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेकडील पाणी नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार संभाजीनगर, हुतात्मा स्मारक, खैरी प्लॉट या भागातील काही नागरिकांच्या नळांना येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे नमूद झाले. याचा अहवाल नगरपरिदेसह जिल्हा शल्यचिकित्सक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना प्राप्त झाला .त्याकडे अद्याप कोणी लक्ष दिल्याचे दिसत नाही. ही स्थिती बऱ्याच वर्षांपासूनची बारमाही असल्याने पावसाळ्यातही शहरात पाणी समस्या जाणवते. ज्यांना शक्य आहे ते विकतचे पाणी घेतात. परंतू, सर्वसामान्यांचे पाण्यावाचून हाल होताहेत. 

संपादन ः राजन मंगरुळकर