वॉटर कप स्पर्धेतील गावांची होणार समृद्धी, श्रमदानाला यंदा शासकीय योजनांचीही जोड

Paani Foundation
Paani Foundation

बीड : पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत उन्हातानात श्रमदान करून ग्रामस्थांनी गावे पाणीदार केलीच. शिवाय बक्षिसांवरही मोहर लावून या रकमेतून गावाचा विकास साधला. यंदा या गावांत ग्रामसमृद्ध योजना राबविली जात असून, यात पाच तालुक्यांतील १३२ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या श्रमदानाला यंदा शासकीय योजनांचीही जोड देऊन गावे समृद्ध केली जाणार आहेत.

पूर्वी केवळ जलसंधारणाची कामे श्रमदान आणि संस्थांच्या मदतीतून केली जात. काही वेळा शासकीय पातळीवरून इंधन खर्चही केला जाई. आता या गावांत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसह कृषीच्या फळबाग लागवड योजना आदी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवून दरडोई उत्पन्न वाढीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. शासकीय येाजनांसह कार्पोरेट कंपन्यांचाही हातभार घेतला जाणार आहे.


जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला यापूर्वी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. ४५ दिवसांच्या स्पर्धेत ग्रामस्थ श्रमदानासह गावपातळीवर वर्गणी जमा करून इंधन, मशीनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करत. यंदा यात बदल करून आता दीड वर्षासाठी ही योजना राबविली जाणार आहे. यात बीड, केज, अंबाजोगाई, धारूर व आष्टी या पाच तालुक्यांतील १३२ गावांची निवड करण्यात आली.

या गावांत ग्रामस्थांच्या श्रमदानासह यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही कामे केली जाणार आहेत. योजनेत गाव असल्याने आता ‘मनरेगा’तील अनियमिततेलाही आळा बसणार आहे. यासह शासनाच्या इतर योजनांची अंमलबजावणीही या गावांत केली जाणार आहे. जलसंधारणासह शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न या योजनेतून यंदा केला जाणार आहे.

शेतकऱ्याला सर्वाधिक त्रास महावितरणच्या भोंगळ कारभाराचा; आमदार-खासदारांची...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार
यंदा योजनेत बदल झाला असून, आता दीड वर्षे ही ग्रामसमृद्ध योजना स्पर्धा सुरू राहणार आहे. त्यात शासकीय योजनांचाही समावेश असणार आहे. त्याची योग्य अंमलबजावणी होऊन जलसंधारणासह शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आता यात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही पुढाकार घेतला असून, शनिवारपासून (ता. १२) त्यांनी संबंधित तालुक्यातील शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन संवाद सुरू केला. शनिवारी बीड व केजला त्यांनी बैठक घेतली. रविवारी अंबाजोगाई, धारूरला व सोमवारी आष्टीला बैठक घेणार आहेत.

स्वयंसेवकांना ऑनलाइन प्रशिक्षण
दरवर्षी योजनेत समाविष्ट गावांतील निवडक लोकांना कामे करण्याबाबत पाणी फाउंडेशनतर्फे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावात ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक गावांतून सहा-सात लोकांची निवड केली असून, लवकरच प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे पाणी फाउंडेशनचे समन्वयक संतोष शिनगारे यांनी सांगितले.

या गावांचा आहे समावेश
अंबाजोगाई तालुका : खापरटोन, पाटोदा, कुंबेफळ, सेलू अंबा, दैठणा राडी, कोळ कानडी, देवळा, भावठाणा, ममदापूर (परळी), मांडवा पठाण, हातोला, धानोरा खुर्द, गिरवली (अपेट), सुगाव, साळुंकवाडी, उजनी, भतानवाडी, वरपगाव, सनगाव, राडी तांडा, माकेगाव, शेपवाडी, श्रीपतरायवाडी, येल्डा, पूस, पोखरी, उजनी, अंजनपूर, चंदनवाडी.

आष्टी : आनंदवाडी, करंजी, कासेवाडी, सराटेवडगाव, पांगुळगव्हाण, शेरी बुद्रुक, लोखंडवाडी, कानडी बुद्रुक, टाकळसिंग, सालेवडगाव, पिंपळगावदाणी, वाहिरा, सुंबेवाडी, सोलापूरवाडी, हातोला, चिंचाळा, शिंदेवाडी, हिवरा, खकाळवाडी, टाकळी आमिया, चिखली, खडकत, वाघळूज, खकाळवाडी.

केज : पळसखेडा, आनंदगाव, काशिदवाडी, दिपेवडगाव, बावची, लहुरी, पाथरा, पैठण, सावळेश्वर, आवसगाव, नामेवाडी
कळमआंबा, केवड, मस्साजोग, वाकडी, पिंपळगव्हाण, चंदनसावरगाव, नागझरी (ल.), बनसरोळा, औरंगपूर रामेश्वरवाडी, आनेगाव,साबला, सातेफळ, देवगाव, राजेगाव.

धारूर : निमला, पांगरी, हासनाबाद, हिंगणी (बुद्रुक), देवठाणा, शिंगणवाडी, कचारवाडी, सोनीमोहा, मोरफळी, मोठेवाडी, सुरनरवाडी, आमला, व्हरकटवाडी, आसोला, कारी, कोळ पिंपरी, अंजनडोह, मोहखेड, जायभायवाडी, अंबेवडगाव,पिंपरवाडा, खोडस, कांदेवाडी.

काय सांगू दादा, कोरोनाने घात केला ! 'म्या' पाच एकर पपईचा बाग मोडला !

बीड : कानडी (घाट), पोखरी (मैंदा), आहेर लिंबगाव, गुंधेवाडी, शहाजानपूर (रुई), घाट सावळी, बकरवाडी, देवऱ्याचीवाडी, औरंगपूर, आनंदवाडी (घाट), मांडवखेल, नाळवंडी, बाभूळ खुंटा, पिंपळगाव घाट, कळसंबर, उमरद, जहागीर, तळेगाव, रामगाव, सांडरवन, घाट जावळा मैंदा, खामगाव, मुळुकवाडी, लिंबा गणेश सौंदाना, हिंगणी (बुद्रुक), अंथरवण पिंप्री बोरखेड, आहेरचिंचोली.


यापूर्वीच्या स्पर्धांत ग्रामस्थांनी तन-मन-धनाने झोकून देऊन गावे जलसमृद्ध केली आहेत. आता दीड वर्षाच्या स्पर्धेत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, बीड
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com