तावडेंना "मराठी'चे वावडे 

अतुल पाटील - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे सोमवारी (ता. 27) दिवसभर "टिवटिव' करीत असतानाच त्यांच्या संकेतस्थळावर मात्र, "टॉप प्रायोरिटीज'मध्ये असलेल्या "मराठी लॅंग्वेज'वर क्‍लिक केल्यावर "उप्स्‌! दॅट पेज कान्ट बी फाउंड' असा संदेश पाहायला मिळत आहे. त्यामुळे तावडेंना मराठीचे वावडे आहे की काय? असाच प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

""कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच # गौरव दिन. त्यांच्या स्मृतीस वंदन करून आज दिवसाची सुरवात करू या. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!'' असे पहिले ट्विट करून विनोद तावडे यांनी दिवसाची सुरवात केली खरी. त्यानंतर ""मराठी भाषा गौरव दिन यानिमित्त, मराठी अस्मिता व मराठी अभिमान साजरा करताना मराठी भाषा संवर्धनाची, त्यात व्यक्‍त होण्याची जबाबदारी घेऊ या.'' तिसरे ट्विट ""दर्जेदार मराठी साहित्याची भाषांतरे होणे, तसेच इतर भाषांतील लिखाण मराठीमध्ये भाषांतरित होणे गरजेचे आहे. जेणेकरून मराठी भाषा समृद्ध होईल.'' असे एकामागोमाग एक ट्विट करीत विनोद तावडे यांनी ट्विटरवर रिट्विट, लाईक्‍स्‌ मिळवल्या. ट्विटरवर त्यांचे 88 हजार 400 फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी त्यांनी स्वत:च्या संकेतस्थळाकडे मात्र साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. 

"विनोद तावडे डॉट कॉम'वर गेल्यानंतर मंत्री महाराष्ट्र राज्य, त्यातच मुखपृष्ठ, परिचय, मंत्रालयीन खाती, सेवार्थ, कार्यक्रम, प्रसिद्धी माध्यम, संपर्क असे पर्याय आहेत. त्यात जाऊन माहिती मिळवता येते. त्यानंतर संकेतस्थळावर त्यांनी टॉप प्रायोरिटीज दिल्या आहेत. त्यामध्ये स्कूल एज्युकेशन, हायर ऍण्ड टेक्‍निकल एज्युकेशन, मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऍण्ड वक्‍फ, कल्चरल अफेअर्स, मराठी लॅंग्वेज, स्पोर्ट ऍण्ड युथ वेल्फेअर असे विषय दिले आहेत. सर्वच विषयांवर क्‍लिक केल्यानंतर त्यात फीड केलेली माहिती दिसते. त्याला अपवाद फक्‍त "मराठी लॅंग्वेज'चा आहे. दिवसभर सोशल मीडियावर मराठीचा डंका पिटणारे सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे हे संकेतस्थळाबाबत तरी अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या संकेतस्थळावर "टॉप प्रायोरिटीज'मध्ये असलेल्या "मराठी लॅंग्वेज'वर क्‍लिक केल्यावर "उप्स्‌! दॅट पेज कान्ट बी फाउंड' असा संदेश पाहायला मिळत आहे. 

Web Title: vinod tawade web sites