viral infection : घरोघरी ‘आजीबाईच्या बटव्याचा’ शोध सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

infection

viral infection : घरोघरी ‘आजीबाईच्या बटव्याचा’ शोध सुरू

जालना : सध्या वातावरणात कधी थंडावा, तर उकाड्याचा अनुभव येत आहे. एकीकडे हिवाळ्याची चाहूल तर दुसरीकडे संसर्गजन्य आजाराने नागरिक त्रस्त असल्याचे चित्र शहरात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शहरातील अनेक दवाखाने फुल्ल झाले आहेत.जुन्या काळात असलेल्या ‘आजीबाईंच्या बटव्याचा’ शोध घेतला जात आहे. अशा बदलत्या वातावरणाने घशाला जास्त संसर्ग होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.. अनेक नागरिक दवाखान्यात औषधोपचार घेऊन थकले, परंतु सर्दी, खोकला आणि पडसे मात्र निघून जाण्याचे नाव घेत नसल्याने घरगुती इलाजाकडे नागरिक वळले आहेत, हे विशेष.

दरवर्षी पेक्षा यंदा लांबलेला पावसाळा आणि सध्या हिवाळ्याची चाहूल लागत आहे.सततच्या बदलत जाणाऱ्या वातावरणाने संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी थंडी असते,तर दुपारी कडक उन्ह यासह सायंकाळी उकाडा जाणवतो म्हणून पंखे लावावे लागत असल्याचे चित्र घरोघरी दिसून येत आहे. अशा बदलत्या वातावरणात तेलकट, आंबट, थंड असलेले फळे आणि पदार्थ खाण्यात आल्याने घशाला संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे. त्यातही घशाला संसर्ग होऊन सर्दी, पडसे,ताप येणे,अंगदुखी, डोकेदुखी,खोकला बळावत आहे. शहरात घरोघरी सर्दी, पडसे,खोकल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत असल्याने अनेक दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. थंड वातावरणात घशाला जास्त संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्दी, पडसे आणि खोकला असलेल्या अनेक रुग्ण दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेऊन पंधरा पंधरा दिवस उलटले तरी बरे वाटेना,असे नागरिकांचे अनुभव आहेत.

घशाला संसर्ग...

वातावरणात बदल किंवा थंड वातावरण असेल तर घशाला कोरड पडते,संसर्ग वाढतो. घशाचा संसर्ग वाढला,की आत तोंडाला आणि इतर ठिकाणी परिणाम होतो. ऐन थंड वातावरणात केळी, पेरू, सीताफळ सारखे फळे खाणे, दूध पिणे यासह थंड फळे खाल्याने सर्दी, खोकला आणि पडसे होते.

हे टाळावे...

थंड दूध पिऊ नये

आंबवलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत

तेलकट, मसाल्याचे पदार्थ टाळावेत

दुधाचे पदार्थ खाण्यात

टाळावेत

आजीबाईचा बटवा...

चहात तुळशीची पाने वापरणे

भाजीत मिरे, विलायची, आल्याचा वापर करणे

चहा (दूधविरहित) काळा घेणे

तुरटीच्या पाण्याने गुळणी करणे

अद्रक, तुळशी,अडुळसा पाने, सूंठ,गूळ मिश्रित काढा

वातावरणात कमालीचा बदल होत आहे.याचा परिणाम आरोग्यावर होतो.थंड वातावरण असल्याने सर्दी, पडसे,खोकला येतोच.दुधाचे पदार्थ जास्त खाल्यास चिकट कफ तयार होतो, यामुळेच ताप आणि इतर विकार होतात. संसर्ग टाळावेत यासाठी चहात तुळस,अडुळसा, विलायची टाकावी. चहा किंवा भाजीत आले टाकले तरी फरक पडतो. थंड पदार्थ आणि फळे,तेलकट, आंबट पदार्थ टाळावेत.

- आकाश धुळे आयुर्वेद तज्ज्ञ,जालना