सोयगावच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव पारित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश होऊन 24 तास उलटत नाही तोच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय खेळी करून नाराज शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना हाताशी धरत सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव 13 विरुद्ध शून्य मतांनी पारित करून आमदार अब्दुल सत्तारयांना पहिलाच धक्‍का दिला.

सोयगाव (जि.औरंगाबाद ) ः कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश होऊन 24 तास उलटत नाही तोच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय खेळी करून नाराज शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना हाताशी धरत सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव 13 विरुद्ध शून्य मतांनी पारित करून आमदार अब्दुल सत्तारयांना पहिलाच धक्‍का दिला.

यामुळे सोयगावात राजकीय समीकरणे बदलली आहेत. सोयगाव नगर पंचायतीत शिवसेना-भाजप युतीच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्याविरुद्ध पंधरा दिवसांपूर्वी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर मंगळवारी (ता.तीन) सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सभागृहात 13 नगरसेवक उपस्थित होते. या सर्वच नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले, यामध्ये शिवसेनेची तीन मते फुटून भाजपच्या बाजूने पुरेपूर संख्याबळ मिळाल्याने तेरा विरुद्ध शून्य असा ठराव पारित करण्यात आला. शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य गैरहजर राहिले. वर्ष 2015 मध्ये झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत सोयगावमध्ये शिवसेना-भाजप युती होती. दोघांनीही अडीच अडीच वर्षे अध्यक्षपद भूषवायचे, असा फॉर्म्युला ठरला होता. पहिल्या टर्मला भाजपचे कैलास काळे हे अध्यक्ष झाले. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस असे समीकरण उदयास आल्यावरून त्याचे पडसाद सोयगावला उमटले.

शिवसेनेने भाजपची साथ सोडत सत्तार समर्थक कॉंग्रेस सदस्यांचा पाठिंबा घेत प्रतिभा बोडखे यांची दुसऱ्या टर्मला निवड केली होती. याबदल्यात कॉंग्रेसला उपाध्यक्षपदही बहाल करण्यात आले; परंतु भाजप-शिवसेना यांच्या युतीतील जिल्हाभरात धुसफूस होत सुरू होती. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून रेंगाळलेल्या प्रक्रियेला अचानक वेग आला व अखेर सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त साधत नाराज झालेल्या शिवसेनेच्या तीन व कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाला हाताशी घेऊन भाजपचे नऊ अशा तेरा सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले.
येत्या दहा दिवसांत नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता असून, भाजप या पदावर आता कोणाची वर्णी लावतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

शिवसेनेच्या गटनेत्याची आगपाखड
शिवसेनेचे गटनेते भागवत गायकवाड यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षप्रमुखांनी विश्वासात न घेता अब्दुल सतार यांना पक्षात प्रवेश दिल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली आहे, यामुळे सोयगावात अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाला पहिला विरोध झाला आहे.

सभागृहात उपस्थित सदस्य
भागवत गायकवाड, लतीफ शहा, वर्षा मोरे, वंदना बनकर, योगेश मानकर, कैलास काळे, मनीषा चौधरी, युवराज आगे, अनिता तडवी, योगेश पाटील, सुलताना देशमुख, सिकंदर तडवी, शोभा मोरे. अविश्‍वास ठराव पारित झाल्यानंतर भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे, पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, शहराध्यक्ष सुनील ठोंबरे, वसंत बनकर, शांताराम देसाई, मधुकर पाटील, दीपक पाटील, मंगेश सोहनी, रवींद्र पाटील, बापू काळे, नाना घुले, भरत काळे, राजेंद्र जावळे, अनिल चौधरी, जितेंद्र झंवर, कादिर शहा, सुरेश मनगटे आदींनी जल्लोष केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vote Of Confidence Passed Against Soygaon Muncipal Council Chief