esakal | अधिक मास कोरोनाच्या सावटात, जावयांची मेजवानी हुकली : भेटवस्तूंही नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावर्षीचा अधिक मास हा कोरोनाच्या सावटात सापडल्याने अनेक जावयांना मेजवानी करून यथाशक्ती कपड्यांसह भेटवस्तूंना मुकावे लागत अल्याचे दिसून येत आहे.

अधिक मास कोरोनाच्या सावटात, जावयांची मेजवानी हुकली : भेटवस्तूंही नाही 

sakal_logo
By
दिलीप मोरे

देवगावफाटा (जिल्हा परभणी) : दर तीन वर्षांनी अधिक मास येत असल्याने हिंदु धर्मात या महिन्यात अनेक धार्मिक व्रतवैकल्ये केली जातात. मात्र, यावर्षीचा अधिक मास हा कोरोनाच्या सावटात सापडल्याने अनेक जावयांना मेजवानी करून यथाशक्ती कपड्यांसह भेटवस्तूंना मुकावे लागत अल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जावाईबापुंसह त्यांच्या घरातील सर्वच सदस्यांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळत आहे.

या महिन्यात जावई व लेकीला मिष्टान्न भोजन व भेटवस्तू दिल्यास पुण्य मिळते अशी श्रध्दा आहे. याच आधारावर आपल्या लेकीसह जावयांना आमंत्रित करून मौल्यवान भेटवस्तू दिल्या जातात. वास्तविक खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून सौर वर्षे व चंद्र वर्षे यातील दर वर्षाचा अकरा दिवसांचा फरक जुळविण्यासाठी दर तीन वर्षांनी एक महीना हा अधिक धरला जातो. ही वार्षिक कालगणना समायोजन करण्यासाठी खगोलीय योजना आहे परंतु यास दानधर्माचा महिना असे संबोधत वस्त्र, सोने तसेच अन्नदान करण्याची प्रथा पडलीय; वर्षानुवर्षे ही परंपरा पुढेही सुरूच आहे.

हेही वाचा - वाहनधारकांनो सावधान : पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सुचनेवरुन वाहतूक शाखा जोमात

पुढील तीन वर्षे या मेजवानीची वाट पहावी लागणार

मात्र यंदा कोरोनामुळे लेकी-जावयांना धोंड्याच्या मेजवानीला मुकावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. ज्या जोडप्यांचा हा पहिलाच धोंडा होता अशांना तर आता पुढील तीन वर्षे या मेजवानीची वाट पहावी लागणार आहे. विविध कार्यक्रमात एकत्र आल्यावर कोरोना संसर्ग वाढत असल्याचे समोर आल्यामुळे बहुतांश लोक एकत्र येण्याचे टाळत आहेत. त्यामुळे यावर्षी धोंड्याची मेजवानी न करण्यावरच अनेक सुज्ञ लोकांचा आता भर असल्याचे दिसून येत आहे. काही सासु सासऱ्यांनी तर जावायाचे लाड पुरविण्यासाठी गर्दी नको आपणच जावून कपडे करून येऊ असे म्हणत थेट जावायाचे घर गाठले आहे. त्याच ठिकाणी त्यांनी जावाई बापुंना कपडे लक्ते करून धोंडा साजरा केला असल्याचे पहावयास मिळत आहे.

जावाईबापूंचा हिरमोड...!

या महिन्यात खासकरून जावयांना धोंडे जेवणासाठी सासुरवाडीला निमंत्रित केले जाते. तसेच त्यांना सासरकडून कपड्यांसह एखादी सोन्या -चांदीची भेटवस्तू दिली जाते. जावयांसोबत अन्य मंडळींना सुध्दा आमंत्रित केले जाते. यात नवा - जुना असा भेद नसतो. त्यामुळे धोंड्याचा महिना म्हटले की, जावाईबापूंसाठी एक पर्वणीच असते मात्र यावर्षीचा अधिक मास कोरोनाच्या सावटाखाली येत असल्याने जावाईबापूंचा मोठा हिरमोड झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक जावाई अजूनही धोंड्याचे जेवणाची वाट पहात असल्याचे दिसून येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे