शासनकर्त्यांना पाठीवर ‘कोरडा’ मारून जागे करा

kandhar.jpg
kandhar.jpg


कंधार, (जि. नांदेड)ः आपल्या अंगावर कोरडा मारून मारून जन्म गेला. किती मार खावं. आता आपण मार खायचा नाही. आता हा कोरडा सरकारच्या, बलात्कार करणाऱ्यांच्या, भांडवलशाही निर्माण करणाऱ्यांच्या, आम्हाला अज्ञानात ठेवणाऱ्यांच्या, बईमान होणाऱ्या त्या महाबईमानांच्या पाठीत मारण्यासाठी वापरायचा. आपण मारून घ्यायचं नाही. शासनकर्त्यांच्या पाठीत हा कोरडा मारून त्याला जागे करा, असा एल्गार गुराखी साहित्य संमेलनाचे संयोजक शंभरवर्षीय माजी आमदार व खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांनी केला.


देशभरात नव्हे, तर जगात आगळ्या वेगळ्या पद्धतीने भरविल्या जाणाऱ्या २८ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे मंगळवारी (ता. २८) सूप वाजले. डॉ. धोंडगे यांच्या संकल्पनेतून गुरखीगड (ता. लोहा) येथे जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. या वर्षी संमेलनाचे २८ वे वर्ष आहे. रविवारपासून (ता. २६) हे संमेलन सुरू होते. तीन दिवस चालणाऱ्या संमेलनाच्या समारोप प्रसंगी डॉ. धोंडगे यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर आसूड ओढले. या वेळी त्यांनी भाऊक होत ‘पुन्हा येणे नाही, तुका म्हणे’ असे म्हणत उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. मृत्युंजयी आमचं साहित्य, मृत्युंजयी आमचं गुरखीगड, मृत्युंजयी तुमच्या पायाची धूळ, असे म्हणून त्यांनी गुरखीगड, गुराखी साहित्य आणि गुराखी कलावंतांची कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा - दलितवस्ती भ्रष्टाचार प्रकरणातील कंत्राटरास कोठडी ​
माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, संमेलनाध्यक्ष गंगाधर शिंदे, प्रमुख पाहुण्या प्रा. लीलाताई आंबटवाड, प्राचार्य डॉ. अशोक गवते, प्राचार्य डॉ. गिरमाजी पगडे, व्ही. जी. चव्हाण, माधवराव पेठकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी पार पडलेल्या खुल्या अधिवेशनात गुराखी गडाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडे एक कोटी रुपयांची मागणी करणे, गुराखी कलावंतांना दरमहा तीन हजार मानधन देणे आदी चार ठराव टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आले.


या वेळी प्रा. वैजनाथ कुरुडे, माधवराव आंबटवाड, प्राचार्या डॉ. औरादकर, प्रा. कच्छवे, डॉ. रज्जाक कासार, प्रा. डॉ. प्रकाश डोंपल्ले, डॉ. गंगाधर तोगरे, डॉ. खामकर, डॉ. सावंत, मुख्याध्यापक बाबाराव बसवंते, मुख्याध्यापक संभाजी उंद्रटवाड, मुख्याध्यापक हरिहर चिवडे, मुख्याध्यापक मंजूर अहमद, मुख्याध्यापक पुरुषोत्तम संगेवार, मुख्याध्यापक मधुकर जाधव, मुख्याध्यापक के. एल. भगत, प्रा. पांचाळ, प्रदीप इंगोले, अनिस खान, बाबूराव पानपट्टे, निखील भांगे, प्रा. पुजारी, रमाकांत जोगदंड, बालाजी जवादवाड, निलेश गायकवाड यांच्यासह संस्थांतर्गत शाळा, महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, गुराखी कलावंत उपस्थित होते.


गेल्या २८ वर्षांपासून डॉ. केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. परंतु, अद्याप सरकारकडून या संमेलनाला दमडीचीही मदत देण्यात आली नाही. एकीकडे सरकार प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनास कोट्यवधींची मदत करते, तर दुसरीकडे गुराख्यांच्या संमेलनाची उपेक्षा करते. हा अन्याय सहन केला जाणार नाही. गुराखीराजे व कलावंतांना मानधन उपलब्ध करून सरकारने त्यांना न्याय देण्याची गरज आहे.
- प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, स्वागताध्यक्ष, गुराखी साहित्य संमेलन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com