शाळेच्या भिंती बोलू लागल्या...!

रंगनाथ गडदे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

चारठाणा (ता.जिंतूर, जि. परभणी) येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी अफलातून शक्कल लढवली आहे. शाळेला मिळणाऱ्या वार्षिक निधी इतरत्र वायफळ खर्च न करता त्यांनी शाळेच्या वर्गखोल्यांना बोलके करण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे.

चारठाणा (ता.जिंतूर, जि. परभणी) : पापुद्रे निघालेल्या भींती, कोपऱ्यांना गेलेले तडे, छताला लागलेली जळमटे जिल्हा परिषदेच्या शाळांची यापेक्षा वेगळी अवस्था नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा खासगी शाळांकडे कल वाढू लागला आहे. त्याला आळा घालण्यासाठी तालुक्यातील चारठाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी अफलातून शक्कल लढवली आहे. शाळेला मिळणाऱ्या वार्षिक निधी इतरत्र वायफळ खर्च न करता त्यांनी शाळेच्या वर्गखोल्यांना बोलके करण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची दिवसेंदिवस बिकट अवस्था होत आहे. पटसंख्या कमी असल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. खासगी शाळांचे फुटलेले पेव, रंगीबेरंगी वर्गखोल्यांवर पालक आणि विद्यार्थ्यांना खासगी शाळांचा लागलेला लळा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी संख्येवर वेगाने परिणाम करीत आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेतील शालेय शिक्षकाने अफलातून उपाय शोधून काढला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या टिकून ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग मिळविणे सर्वात महत्त्वाचे व शैक्षणिक वातावरण मनोरंजक असायला हवे. यासाठी येेथील शिक्षक एन. एस. गडदे व अनिल स्वामी यांनी काळवंडलेल्या भींतींना बोलके करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्ययध्यापक साबळे यांचे व शालेय समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचे मन ओळवून रंंगकाम करण्यासाठी मंजुरी घेतली. या साठी गावातील एक पेंटरला कमीत कमी खर्चात शाळेला रंगरंगोटी करण्याचे काम दिले. शाळेच्या काही खोल्याची रंगरंगोटी झाली असून उर्वरित काम चालू आहे.

हेही वाचा - नळजोडणी दराबाबत फेरविचार करा : विभागीय आयुक्त केंद्रेकर

भिंतींवर उजळणी, पाढे
भिंतींवर उजळणी, पाढे, लेखक आणि त्यांची पुस्तके, संत, भौगोलिक माहिती, पक्षी, प्राणी आदी रंगसंगती वापरून त्यांनी चित्र रेखाटली आहे. याचा गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थी संख्येवरही नक्की अनुकूल परिणाम होईल, अशी आशा येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांनी व्यक्त केली आहे. सध्या शाळेची पहिली ते सातवीची मिळून २८४ ऐवढी पटसंख्या असून पुढील वर्षी यात दुप्पट वाढेल अशी अपेक्षा येथील शिक्षकांना आहे.

 हेही वाचा -  वाहतूक पोलिसांनी सायकलवरून गाठले कार्यालय

हसत खेळत शिक्षण : नारायण गडदे
ताणतणाव न घेता आनंदाने हसत खेळत शिक्षण दिल्यास त्याचा गुणवत्ता वाढीवर नक्की परिणाम होतो. शैक्षणिक वातावरण बोलके असेल तर विद्यार्थी आपोआप त्यांच्या स्वतःच्या भाषेत व्यक्त व्हायला सुरू होतात. आनंददायी व ज्ञानरचनावादी शिक्षण निसर्गातील रंगांच्या मदतीने मुलांच्या मनापर्यंत पोचविणे सहज शक्य होते. पुस्तकातील उतारे भितींवर, फर्शीवर चितारल्याने पुस्तकाचे आणि दप्तराचे अनाहुत ओझे कमी होऊन विद्यार्थी शाळेच्या परिसरात आनंदाने रमून जातो. त्यासाठीच या भिंती बोलक्या करण्याचे काम सुरू केले असल्याची प्रतिक्रिया शिक्षक नारायण गडदे यांनी ‘सकाळ’ला बोलताना दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The walls of the school started talking ...!