मराठा आरक्षणासाठी वसमतला ढोल बजावो आंदोलन

पंजाबराव नवघरे
Tuesday, 29 September 2020

संघर्षाने मराठ्यांना मिळालेले आरक्षण महाराष्ट्र शासनाला न्यायालयामध्ये टिकवता आले नाही. परिणामी, न्यायालयात आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे.

वसमत (हिंगोली) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता.२९) उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल बजावो आंदोलन केले. यावेळी आमदार राजू नवघरे यांनी ढोल वाजवून आंदोलनात सहभाग घेतला.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वाच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे . मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत आरक्षण दिले. मात्र, मिळालेले आरक्षण न्यायालयामध्ये टिकविण्यासाठी असमर्थ ठरल्याने न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे मराठा समाजबांधवातून नाराजीचा सूर उमटत आहे. 

केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण मिळवून द्यावे, भविष्यात मराठा समाजाचा सरसगट ओबीसी गटात समावेश करावा, मराठा समाजास न्यायालयात टिकणारे संविधानाच्या चौकटीत राहून इतर आरक्षणास धक्का न लावता कायम आरक्षण मिळवून दयावे, या व इतर मागण्यासाठी मंगळवारी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी नऊ वाजेपासून सकल मराठा समाज बांधव एकत्रित येत होते. 

मंगळवारी सकाळी ११ वा.सकल मराठा समाज एकत्रित येवून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनीही आंदोलनात सहभागी होत ढोल वाजवून शासनाचे लक्ष वेधले. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विधिमंडळात प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना सांगितले. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार याना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

राज्यभरात लाखोंच्या संख्येने ५८ मोर्चे 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे.  या व इतर मागण्यासाठी यापूर्वी राज्यभरात लाखोंच्या संख्येने ५८ मोर्चे काढण्यात आले होते. तसेच काही बांधवांनी आरक्षणासाठी बलिदानही दिले आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे दिवसेंदिवस मराठा समाजाची स्थिती बिकट बनत आहे. मराठा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Wasmat taluka, a dhol bajao agitation was organized for Maratha reservation